Dhananjay Munde in Parali : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचा ठपका असणाऱ्या वाल्मिक कराड याच्यावर विशेष तपास पथकाने (SIT) मंगळवारी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कलमान्वये (मकोका) गुन्हा दाखल केला आहे. या पार्श्वभूमीवर आज वाल्मिक कराड यांच्या जगमित्र कार्यालयातच (Dhananjay Munde ) त्याच्या समर्थकांची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत आंदोलनाची पुढची दिशा निश्चित केली जाणार आहे.
त्याचवेळी दुसरीकडे काल अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर परळीकडे रवाना झालेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे हे बुधवारी पहाटे परळीत दाखल झाल्याची माहिती आहे. अजित पवार यांनी परळीतील वातावरण आणखी चिघळू नये, यासाठी धनंजय मुंडे यांना तातडीने मतदारसंघात धाडल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता धनंजय मुंडे हे वाल्मिक कराड यांचे कुटुंबीय आणि त्यांच्या समर्थकांना भेटून त्यांची समजूत काढणार का? हे पाहावं लागणार आहे.
धनंजय मुंडे राजीनामा देणार का? अजितदादा म्हणाले,मी स्पष्ट सांगतो की..
वाल्मिक कराड याला बुधवारी पुन्हा एकदा केज न्यायालयात हजर केलं जाणार आहे. याठिकाणी संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांकडून पुन्हा एकदा त्याचा ताबा घेतला जाऊ शकतो. सीआयडीकडून देशमुख हत्याप्रकरणाच्या तपासासाठी वाल्मिक कराड यांच्या पोलीस कोठडीची मागणी होऊ शकते. त्यामुळे वाल्मिक कराड इतक्यात तुरुंगातून बाहेर पडण्याच्या शक्यता जवळपास मावळल्या आहेत, अशी चर्चा आहे. त्यामुळे आज परळीत काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी मिळाली असती तरी जामीन मिळवण्यासाठी वाल्मिक कराडला खूप यातायात करावी लागेल. कारण आता वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आला आहे. एखाद्या गुन्हेगारावर मकोका लागतो, तेव्हा बहुतांश काळ हा न्यायालय आणि कोठडी यामध्ये जातो. संतोष देशमुख हत्या प्रकरणात अजूनही एक आरोपी फरार आहे . या प्रकरणाची चौकशी पोलीस करत आहे.