Amol Khatal : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यात शेतकऱ्यांना युरिया खताची कमतरता भासू नये, यासाठी आमदार अमोल खताळ यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना उर्वरित बफर स्टॉक खुला करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार कृषी विभागाने नियोजन करून सुमारे 357 मेट्रिक टन युरियाचा संरक्षित साठा खुला केला असून, हा साठा आता विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.
संगमनेर (Sangamner) तालुक्यात खरीप हंगाम 2026-27 साठी एकूण 700मेट्रिक टन युरिया उपलब्ध करून देण्यात आला होता. त्यापैकी सुरुवातीच्या टप्प्यात 349 मेट्रिक टन युरिया तातडीने विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला होता. मात्र, खरीप हंगामात शेतकऱ्यांकडून युरियाची वाढती मागणी होत असल्याने शिल्लक संरक्षित साठ्यातील युरिया उपलब्ध करून देण्याच्या सूचना आमदार खताळ यांनी कृषी विभागाला केल्या. त्यानुसार उर्वरित सुमारे 357 मेट्रिक टन बफर स्टॉक खुला करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार युरिया उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
कृत्रिम टंचाई करणाऱ्यांवर कारवाई
कृषी विभागाच्या नियोजनामुळे तालुक्यात युरियाचा तुटवडा निर्माण होणार नाही. शेतकऱ्यांना अधिकृत विक्रेत्यांकडूनच युरिया उपलब्ध करून देण्यात यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्यात 30,209 शिक्षक पदांची मेगाभरती; मुलाखतीशिवाय नोकरीची सुवर्णसंधी
कृषी सेवा केंद्र चालकांकडून शेतकऱ्यांकडून जादा दर आकारला जात असल्यास किंवा खताची कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्यास संबंधितांवर तात्काळ कठोर कारवाई करावी, असे देखील आमदार अमोल खताळ यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे.
