Download App

पारनेर बंदच्या हाकेनंतर निलेश लंकेंचे नागरिकांना शांततेचे आवाहन

MLA Nilesh Lanke : पारनेर तालुक्यातील पाबळ येथील एका मुस्लिम तरुणाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याने पारनेरमध्ये वातावरण ढवळून निघाले आहे. या घटनेचा निषेध म्हणून हिंदुत्वादी संघटनांनी आज पारनेर बंदची हाक दिली आहे. दरम्यान कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ नये यासाठी आमदार निलेश लंके यांनी तालुक्यातील नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे. तसेच संबंधित तरुणाने माफी मागितली असून या प्रकरणाला जातीय रंग देऊन कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रकार कृपया कोणीही करू नये, असे आवाहन देखील आमदार लंके यांनी पारनेर तालुक्यातील जनतेला केले आहे.

आमदार लंके नेमकं काय म्हणाले?

पारनेर तालुक्यातील सर्व धर्मीय तमाम जनतेला मी आवाहन करतो की , अखंड महाराष्ट्राचे दैवत असणारे व सर्व धर्म समभावाचा विचार देश विदेशात पोहोचवत महाराष्ट्राच्या विचारांची श्रीमंतीचे पाईक समजले जाणारे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल पाबळ येथील तरुणांनी प्रसारमाध्यमांवर केलेला प्रकार खरोखरच निंदनीय व क्लेशदायक आहे .

लाठीचार्ज केलेले हे वारकरी हिंदू नाही का? रोहित पवारांचा सरकारला सवाल

यापूर्वी या तालुक्यात इतक्या खालच्या पातळीवर जाऊन अशाप्रकारे प्रकार कधीही घडलेला नाही. पारनेर तालुका हा साधू संतांचा, गुणवंतांचा व थोर क्रांतिकारकांचा तालुका आहे. झाल्या गोष्टीबद्दल सदर तरुणाने नाक घासून माफी मागितली आहे. तेव्हा कुठलाही जातीय रंग देऊन हा प्रकार वाढवून कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रकार कृपया कोणीही करू नये .

सदर तरुणावर कायदेशीर कारवाई झाली असून या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे. पोलीस प्रशासन त्यांचे काम करत आहे. पुरोगामी विचारसरणीचा व संस्कारक्षम आपल्या पारनेर तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे ही विनंती!

नेमकं प्रकरण काय?

पारनेर तालुक्यातील पाबळ येथील एका तरुणाने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याची घटना समोर आली आहे. यावरून पारनेर तालुक्यात संताप व्यक्त केला जात असून पारनेर पोलीस स्टेशन मध्ये संबंधित तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ हिंदूवादी संघटनेकडून आज पारनेर तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. दरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Tags

follow us