अहमदनगर: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (district bank) आणि जीएस महानगर बँकेचे चेअरमन (Uday Gulabrao Shelke) अॅड. उदय गुलाबराव शेळके (वय- 46) यांचे दिर्घाजाराने निधन झालं आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या रविवारी सकाळी 11 वाजता पिंप्री जलसेन (ता. पारनेर) या ठिकाणी अंत्यविधी होणार आहे.
उदय शेळके यांना काही महिन्यांअगोदर हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे त्यांना पुणे येथील खासगी रूग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आलं होतं. नंतर त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथील लिलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असतानाच त्यांना ब्रेनस्ट्रोकचा झटका आला. त्यामुळे गेल्या पाच महिने ते हॊस्पिटलमध्येच ठेवण्यात आले होते. लिलावती रूग्णालयात परदेशी डॉक्टरांच्या टीमने त्यांच्यावर उपचार केले. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. रुग्णालयात त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
(स्व.) सॉलिसीटर गुलाबराव शेळके यांचे ते चिरंजीव होते. (स्व.) गुलाबराव शेळके यांचेही निधन हृदयविकारान झाल होत. त्यांच्यानंतर अॅड. उदय गुलाबराव शेळके यांनी जीएस महानगर बँकची धुरा सर्थपणे सांभाळली होती. दीड वर्षांपूर्वी झालेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत त्यांना उमेदवारी देण्यात आली होती. पारनेर सोसायटी मतदारसंघातून त्यांनी मोठ्या मताधिक्याने ही निवडणूक जिंकली होती. त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अॅड. उदय शेळके यांच्या नावावर शिक्काोर्तब केले.
महानगर बँकेतील त्यांच्या कामाची पद्धत पाहून त्यांना ही संधी देण्यात आली होती. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यावर त्यांनी जिल्हा बँकेला आर्थिक शिस्त लावण्यासाठी काम केले. एकाचवेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि जीएस महानगर बँका या दोन बँकांचे अध्यक्षपदाची धुरा त्यांनी समर्थपणे पेलली. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच ज्येष्ठ नेते शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले आहे.