Ajit Pawar Beed Visit : उपमुख्यमंत्री अजित पवार बीडचे पालकमंत्री आहेत. (Ajit Pawar) त्याचबरोबर ते पुण्याचेही पालकमंत्री आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्हा महाराष्ट्राच्या नकाशावर गेली तीच-चार महिन्यांपासून झळकत आहे. अशाच काळात परळीचे आमदार धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर पालकमंत्री या नात्याने अजित पवार वारंवार बीडला येतील असं वाटत होत. मात्र, गेल्या महिन्या दोन महिन्यात ते आले नाहीत. मात्र, आज अजित पवार बीडच्या दौऱ्यावर आहेत. त्यामध्ये त्यांनी अनेक विषयांवर सडेतोड भाष्य केलं आहे. कुणालाच यामध्ये सोडलं नाही. अशीच एकंदरीत स्थिती आहे.
चुकीच्या प्रवृत्तीची असता कामा नये
अजित पवार जातीवादाच्या मुद्यावरही बोललले आहेत. त्याचबरोबर त्यांनी राख गँग, चुलत्यांची कृपा, अशा मुद्यांना हात घातला. जातींमधील दुरावा संपवून बीडला पुन्हा विकासाच्या वाटेवर नेण्याचं काम करावं लागेल. कोणत्याही कार्यकर्त्याला पक्षात घेताना त्याचा रेकॉर्ड तपासा. आपण लोकांना कसं वागायचं सांगतो तेव्हा आपल्या अवतीभवती चुकीच्या प्रवृत्तीची असता कामा नये. एखादी गोष्टी लाईटली घेतली तर त्याची जबर किंमत पक्षाला आणि नेतृत्त्वाला मोजावी लागते, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे. मी सुरुवातीला काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादीत काम केलं. त्यामुळे मला सुदैवाने अनेक गोष्टींचा अनुभव आहे. माझ्या भागात पश्चिम महाराष्ट्रात आणि मराठवाड्यातील लोकांच्या कामाच्या पद्धतीमध्ये फार तफावत आहे. मी इकडे आलो तेव्हा मला एका कार्यकर्त्याने, इकडे या पद्धतीने चालतं, त्या पद्धतीने काम चालतं, असं सांगितलं. पण आपण सवय लावू, तसं घडतं, असे सांगत बीड जिल्ह्यातील कार्यपद्धती बदलण्याचे संकेत दिले.
मी ई-टेंडर काढणार
बीड जिल्ह्यात आपल्याला बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत. पुढच्या ट्रिपला मी कदाचित डीपीडीसीची बैठक घेऊन, कदाचित त्यानंतरच्या ट्रिपलाही बैठकही होईल. पण सध्या मला योग्य वाटतात ती कामं मतदारसंघात मंजूर करायची आहेत. या कामांचा दर्जाही मला पाहायचा आहे. अनेकजण माझ्याकडं निधीसाठी येतात. दादा आम्हाला 10 लाखांचा निधी द्या, म्हणतात. पण मी ई-टेंडर काढणार आहे, यामध्ये 15 लाखांपर्यंतच्या कामांना मंजुरी देणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं आहे.
एका विमानतळाची गरज
आजपर्यंत अनेकांनी बीड जिल्ह्याचं नेतृत्व केलं. सुदैवाने सध्या राज्याचे अर्थखातं माझ्याकडं आहे. बीडमध्ये एका विमानतळाची गरज आहे. दुर्दैवाने आतापर्यंत ते झालं नाही. बीडला जायचं असेल तर एकतर लातूरला उतरावं लागतं किंवा नांदेड, छत्रपती संभाजीनगरला उतरुन यावं लागतं. जिल्ह्यात विमानतळ असेल तर अधिकारी, मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना यायला सोपं असतं, असंही अजित पवार यावेळी म्हणाले आहेत.
बीडमध्ये रेल्वेचं काम किती वर्षे चाललं आहे, हा प्रश्न बीडकरांनी स्वत:ला विचारला पाहिजे. बीडमध्ये रेल्वे यायला इतका विलंब झाला, त्याला जबाबदार कोण? कोणीतरी याची नैतिक जबाबदारी घेतली पाहिजे. कोणीतरी येणार आणि जादूची कांडी फिरवून काम करणार, असं होत नसतं. त्यासाठी पाठपुरावा करावा लागतो. मी आता माझ्या एका अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे. मंत्रालयातही सेक्रेटरी लेव्हलचा माणूस नेमला आहे. या माध्यमातून पाणी, वीज, बीडमधील राष्ट्रीय महामार्ग, शक्तिपीठ महामार्ग, विमानतळ यावर देखरेख ठेवली जात आहे.
अजित पवार बीडमध्ये दाखल होताच अधिकाऱ्यांवर संतापले; म्हणाले तुम्हाला फक्त चार तास देतो
मी आता बीडमध्ये इनक्युबिशन आणि इनोव्हेशन सेंटर सुरु करण्याच्या विचारात आहे. या माध्यमातून बीड जिल्ह्यात 200 कोटींची गुंतवणूक येईल. त्यापैकी 165 कोटी टाटा ट्रस्टच्या माध्यमातून आणणार आहे, 35 कोटी राज्य सरकारकडून आणण्याचा माझा प्रयत्न सुरु आहे. या सेंटरमध्ये बीडमधील तरुण-तरुणींना नवीन प्रशिक्षण द्यायचं आहे. आता कॉमर्स आणि आर्टसच्या डिग्रीला तितकसं महत्त्वं उरलेलं नाही. आता आर्टिफिशिअल इंटेलिजन्स क्षेत्रातील संधी वाढल्या आहेत, असंही अजित पवार यांनी सांगितलं आहे.
राख गँग
बीडमध्ये सगळ्या गँग आहेत , राखेची गँग, वाळूची गँग या सगळ्या गँग आहेत. इथे या सगळ्या गँग सुतासारख्या सरळ करणार असल्याचं अजित पवार म्हणाले. बीड ही देवदेवतांची भूमी आहे. जनतेची सेवा करण्यासाठीचे बळ देण्याचे देवदेवतांना साकडे आहे. बीडकरांची बदनामी करणाऱ्या गोष्टी आपल्याला थांबवायच्या आहेत, असं अजित पवार म्हणाले. तसं,च बीडमध्ये मराठा आणि वंजारी यांच्यात अनेकदा वाद दिसून आले आहेत. यावरही अजित पवारांनी भाष्य केलं आहे. जाती-जातीतील दुरावा आपल्याला संपवायचा आहे, असं अजित पवार यांनी सांगितले. तसंच, प्रतिमा स्वच्छ ठेवा, असं आवाहन देखील अजित पवारांनी कार्यकर्त्यांना केलं.
चुलत्याच्या कृपेने
हाराचा बोझा आहे मानगुटीवर. काही देऊ नका. कर्मधर्म संयोगाने, आईवडिलांच्या कृपेने, चुलत्याच्या कृपेने बरं चाललंय आमचं. काही देऊ नका. फक्त प्रेम द्या. माझा नमस्कार घ्या, तुमचा नमस्कार घ्या. पायाही पडू नका. आजचे पुढारी पाया पडायच्या लायकीचे नाही. ज्यांच्या पाया पडता त्याची हिस्ट्री आठवा. म्हणाल मी कुणाच्या पाया पडलो, कुणाच्या पाया पडलो. आईबापाच्या पाया पडा, गुरूच्या पाया पडा. पूर्वी यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक ही आभाळा एवढी माणसं होती. त्यांच्या पुढे नतमस्तक होऊ ना. छत्रपती शिवाजी महाराज आहे. संभाजी महाराज आहे. राजमाता जिजाऊ, बाबासाहेब आंबेडकर आहे, महात्मा फुले आहेत. असंही ते म्हणाले.
सर्वांची अंडीपिल्ली बाहेर येतात
प्रचार प्रसार आणि संघटन मजबूत करण्यासाठी डीजिटलचा वापर करा. पण चांगल्या कामासाठी करा, असं अजित पवार म्हणाले. काही वेळा सोशल मीडियातून एखादी व्यक्ती दुसऱ्या समाजाची असेल तर दुसरा माणूस त्याला चुकीचं काही तरी बोलतो. व्हॉट्सअप पाठवतो, हे करू नका. आमचे नेते पदावर बसले आहेत. आमचं कोण काय करणार असं मनात आणू नका. टेक्नॉलॉजी खूप पुढे गेली आहे. तुम्हाला वाटत असेल मी मेसेज डीलिट केला. कोण काय करणार. पण तुमचा फोन ताब्यात घेतल्यानंतर तुम्ही कुणाला काय व्हॉट्सअप केलं ते सर्व रेकॉर्ड समोर येतं, असं अजित पवार म्हणाले. ते सर्व फोटो, मेसेज रिकव्हर होतात. ग्रामीण भागात सर्वांची अंडीपिल्ली बाहेर येतात. मी फार पोहोचलेलो आहे, असे विचार मनात आणू नका, असेही त्यांनी सांगितलं.