मुंबई : राज्यामध्ये पुन्हा एकदा पेपर फुटीची घटना घडली आहे. बुलढाणा (Buladhana ) जिल्ह्यामध्ये आज बारावीचा पेपर फुटल्याची घटना घडली आहे. यावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. तसेच राज्याच्या माजी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पेपर फुटीच्या मुद्द्यावरुन सरकारला खडे बोल सुनावले आहेत.
आज बारावीचा गणिताचा पेपर होता. सकाळी पेपर सुरु होण्याच्या आधीच हा पेपर व्हायरल झाला. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडला आहे. परीक्षा सुरु होण्याच्या आधीच पेपरची प्रश्नपत्रिका ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली होती अशी माहिती आहे. यावरुन विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
पेपर फुटत असतील तर सरकार काय झोपा काढत आहे का? पुन्हा म्हणतात की दादा बोलतात. अशा पेपर फुटीच्या प्रकारामुळे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होते. याप्रकरणी सरकारने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी अजित पवारांनी केली आहे.
तसेच माजी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी देखील या समस्येवरुन सरकारवर टीका केली आहे. अशा घटना सातत्याने महाराष्ट्रात घडत आहेत. भरारी पथक काय झोपा काढते आहे का, असा संतप्त सवाल त्यांनी विधानसभेत उपस्थित केला.
यावर शिक्षणमंत्री सभागृहात उपस्थित नसल्याने त्यांच्याऐवजी ज्येष्ठ नेते महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उत्तर दिले आहे. राज्यात सध्या कॉपी मुक्त अभियान सुरु आहे. तरी देखील अशा घटना घडत असतील तर ही गंभीर बाब आहे. याबाबत तातडीने कारवाई करु, असे आश्वासन त्यांनी सभागृहात दिले आहे.