अलीकडील महिन्यात माध्यमांमधून विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या मुलाखती प्रसारित झाल्या. त्यातून “आपल्याला मुख्यमंत्री व्हायला आवडेल”, हे त्यांचे विधान अधोरेखित केले गेले. यादरम्यान महाराष्ट्रातील अनेकांनी आम्हालाही मुख्यमंत्री व्हायला आवडेल, अशा स्वरूपाची वक्तव्य केल्याचे आपल्या सर्वांना ठाऊक आहे. अर्थात हा प्रश्न जसा नशिबाचा आहे, जसा उल्लेख अजित पवारांनी केला होता- तसाच तो वकूबाचा आणि कार्यक्षमतेचाही आहे. त्या आघाडीवर अजित पवार यांना निश्चितच पसंती मिळेल यात वाद नाही. महाराष्ट्राच्या राजकारणाचे, त्यातही पश्चिम -दक्षिण महाराष्ट्रातील राजकारणाचे प्रवाह जवळून पाहताना, यशवंतराव चव्हाण यांच्यानंतरच्या पिढीतील शरद पवार यांचे नेतृत्व आणि त्यांचा वावर माझ्या पिढीने फार जवळून पाहिला आहे.
साधारणतः १९९०नंतरच्या कालखंडात महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर शरद पवारांनी जेव्हा केंद्रीय राजकारणात जाण्याची भूमिका घेतली, तेव्हा अजितदादांचा उदय झाला. हा उणापुरा 33 वर्षांचा कालखंड आहे. व्यक्तिगत जीवनात हा मोठा कालखंड आहे. अजित पवारांचे व्यक्तित्व एका बाजूला सडेतोड आणि परखड असे असले तरी, अनेक बाबतीत त्यांच्या कृतींचे किंवा न बोलण्याचे आडाखे बांधता येत नाहीत, अंदाज करता येत नाहीत. या बाबतीत ते अगदी शरद पवारांसारखेच आहेत. म्हणूनच या व्यक्तिमत्त्वाचे ताणेबाणे समजून घेताना बारामतीपासून त्यांची सुरुवात जी झाली, त्याकडे आपल्याला पहावे लागेल.
महाराष्ट्राच्या राजकारणात बारामती आणि पवार हा एक अद्वैत समास आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाची चर्चा पवारांशिवाय होत नाही.बारामतीच्या विकास प्रारूपाचे कौतुक माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यापासून अनेकांनी केले आहे. अशा बारामतीचे सुपुत्र असलेले, त्याचे दिग्गज नेते शरद पवार यांचे पुतणे असलेले अजित पवार यांचे वेगळेपण या पार्श्वभूमीवर लक्षात घ्यावे लागेल. महाराष्ट्राच्या विद्यमान राजकारणात माजी उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे स्थान फार महत्त्वाचे आहे. महाराष्ट्राच्या भावी मुख्यमंत्री पदाच्या दिशेने त्यांच्या राजकारणाची आणि आकांक्षांची वाटचाल आहे, हे लपून राहिलेले नाही.
अजित पवार, गोपीनाथ मुंडे,महाराष्ट्राच्या राजकरणातील या बड्या नेत्यांचे अपघाती मृत्यू
सारा महाराष्ट्र त्यांना अजितदादा म्हणून ओळखतो. त्यांचे करारी व्यक्तिमत्व, दमदार आवाज, प्रशासनावरील हुकूमत, निर्णय घेण्याची क्षमता यामुळे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक आगळे वेगळे व्यक्तिमत्व म्हणून मान्यता पावले आहे. पुण्यात पत्रकार म्हणून गेली चार दशकाहून अधिक काळ वावरताना, ज्याप्रमाणे देशातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांची वाटचाल आणि त्यांचे व्यक्तिमत्व जवळून पाहता आले, तसेच अजितदादांबाबत माझ्या समकालीन पत्रकारांचे निरीक्षण आहे. पुण्याच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात सुमारे चार दशकांपूर्वी शरद पवार, मोहन धारिया, रामभाऊ म्हाळगी, विठ्ठलराव गाडगीळ, उल्हास पवार, सुरेश कलमाडी, प्रकाश ढेरे, वसंतराव थोरात, अण्णा जोशी, अरविंद लेले अशा अनेक व्यक्तिमत्वांशी मी परिचित होतो आणि त्यासंबंधी वार्तांकन तसेच प्रासंगिक लेखनही करत होतो. काँग्रेसच्या वर्तुळातून सुसंस्कृत राजकीय नेत्यांना कलमाडींच्या आगमनानंतर अलगद बाजूला ठेवण्यात आले, त्या तपशिलात आता मी जात नाही.
कलमाडींचा उदय झाल्यानंतरच्या दशकात पुणे जिल्ह्याच्या राजकारणात अजितदादांचा उदय होत होता. कारण देशाच्या राजकारणात शरद पवारांना प्रभावीपणे प्रवेश करायचा होता. अशावेळी बारामतीची सूत्रे कोणाकडे द्यावयाची, हा मोठा विषय होता. माळेगाव सहकारी साखर कारखान्यातील पवारांचे काही सहकारी त्यासाठी इच्छुक होते. मात्र पवारांनी निवड केली अजितदादांची. सुप्रिया पवार यांचा या दरम्यान विवाह व्हावयाचा होता. त्यामुळे या सर्व वातावरणात पवारांना आपला एक विश्वासू सहकारी बारामतीच्या राजकारणात हवा होता. तो त्यांना आपल्या पुतण्याच्या रूपाने मिळाला आणि मग अजितदादांची पुढील वाटचाल सुरू झाली.अर्थात पवारांची निवड ही केवळ नातेसंबंधावर नव्हती, हे येथे मुद्दाम आणि आवर्जून नोंदवले पाहिजे. कारण जिल्हा स्तरावरील अनेक सहकारी संस्थांवर
अजितदादा काम करत होते आणि अतिशय सक्षमपणे ते ती जबाबदारी निभावत होते, हे पवार पाहत होते.
बारामती लोकसभा मतदारसंघातून १९९१ मध्ये शरद पवार निवडून गेल्यानंतर त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत अजितदादा निवडून आले. यापूर्वी मी वर म्हटल्याप्रमाणे त्यांनी १६ वर्षे माळेगाव सहकारी साखर कारखाना आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या संचालक मंडळात काम केले होते. जवळच्याच सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या राजकारणातही दादांनी दीर्घकाळ लक्ष घातले होते. एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणाचा पोत हा सहकारी चळवळ आणि संघटना यांच्या माध्यमातून पुढे जाण्याचा तो काळ होता. अजितदादा त्यात अतिशय वाकबगार होते आणि यशस्वी होत पुढे निघाले होते.
पवारांना त्यांची धमक ठाऊक होती. सुप्रिया पवार यांचा विवाह मार्च १९९१ मध्ये बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडला. यावेळी देशातील अनेक मोठे नेते बारामतीला येणार होते, त्यासाठी बारामतीच्या विकासाचा धुमधडाका अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू होता. त्याच्या बातम्या आम्ही लोकसत्तामधून कव्हर करत होतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या निमित्ताने बारामतीच्या विकासाला जो वेग मिळाला, तो आजही कायम आहे, हे बारामतीला भेट देणाऱ्या प्रत्येकाला जाणवत असेल. विकासाची ही दूरदृष्टी अजितदादांकडे आपल्या काकांकडून आली, हे अतिशय स्पष्ट आहे. त्यामुळेच विकासाचे राजकारण करताना तडफेने निर्णय घेण्याची अजितदादांची शैली राहिलेली आहे. त्याबाबत अनेकांचे अनेक अनुभव आहेत.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संसाधनांचा विकास, जलसंधारणाच्या सुविधा आणि शैक्षणिक प्रगतीची जाण याबाबत ते नेहमीच जागरूक असे नेते राहिले आहेत, ती त्यांची ओळख आजही कायम आहे.आजही पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत . पुणे शहराच्या राजकारणापेक्षा जिल्ह्याच्या राजकारणात अजित दादांनी नेहमीच आपला ठसा उमटवला आणि पूर्वी काँग्रेस पक्षाला आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यश मिळवून दिले. एकदा बारामती लोकसभा मतदारसंघातील पोट निवडणुकीत काँग्रेसच्या वतीने बापूसाहेब थिटे हे उमेदवार होते. त्यांच्या प्रचाराची जबाबदारी पवार यांनी अजितदादांवर सोपवली होती.
मी बारामतीपासून नजीकच्या काही गावातील प्रचार दौऱ्यामध्ये अजितदादांसमवेत सहभागी झालो होतो .बापूसाहेब थिटे दुसऱ्या भागात प्रचार करत होते. या प्रचारात गाव वस्तीवर आणि काही ठिकाणी गावांच्या वेशीवर अजितदादा ज्या आत्मविश्वासाने आणि ठामपणे भाषण करीत, त्याचे मला आजही स्मरण आहे. या भाषणात ते एक गोष्ट अधोरेखित करीत आणि ती म्हणजे, “साहेब उभे आहेत. हे तुम्ही लक्षात ठेवा आणि बापूसाहेबांना मतदान करा”. ही एक वेगळीच निवडणूक होती. शरद पवारांनी जी राजकीय पायाभरणी केलेली आहे आणि अजितदादांसारख्यांना जी संधी दिली आहे, ती किती जाणीवपूर्वक दिली याचा एक अंदाज या दौऱ्यात मला आला.
माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार २००९ साली उभे राहिले आणि त्यानंतर बारामतीतून सुप्रिया सुळे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार राहिल्या. बारामतीमधील प्रचाराची सर्व सूत्रे कर्णधार म्हणून अजितदादांकडे असतात आणि ती ते अतिशय नेटाने निभावतात. बारामती लोकसभा मतदारसंघात बारामतीसह इंदापूर, दौंड, पुरंदर, भोर आणि खडकवासला असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. या सर्व ठिकाणी अजितदादा अतिशय नेटकेपणाने प्रचार करतात. त्यामुळे सुप्रिया सुळे २००९, २०१४ आणि २०१९ या तिन्ही वेळेला या लोकसभा निवडणुकीत अतिशय उत्तमपैकी विजयी झाल्या आहेत.
अजितदादा हे एक अतिशय सक्षम असे नेते आहेत. शरद पवारांच्या एकूण कार्यशैलीचा त्यांच्यावरचा प्रभाव लपत नाही, इतका तो त्यांच्या व्यक्तिमत्त्वात मुरलेला आहे. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे भल्या सकाळी सकाळी कामाला सुरुवात करायची. त्यानंतर संस्थात्मक आणि प्रशासकीय कामे जशी जबाबदारी असेल त्याप्रमाणे पूर्ण करायची. रात्री उशिरा दादा एखाद्या पार्टीत रमले आहेत, अशी खरी खोटी अफवादेखील कधी ऐकायला मिळाली नाही. त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व शिडशिडीत राहिले आहे. दादांचे थेट बोलणे त्यांचा दमदार आवाज आणि त्यांची बोलण्याची शैली हे आजही हजारो कार्यकर्त्यांना आकर्षून घेते.
बारामतीमधून पवार मंडळींना नॉन प्लस करण्याचे राजकारण भाजप आणि विरोधी पक्षांनी नेहमीच केले आहे, पण त्याचा शून्य परिणाम आजवर जाणवत आला आहे.अशीच एक खेळी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आखली. धनगर समाजाचे एक अत्यंत बोलघेवडे नेते गोपीचंद पडळकर हे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सांगली लोकसभा मतदारसंघातून उभे होते, तिथे त्यांना अपयश मिळाले. दरम्यान फडणवीस यांनी त्यांना भारतीय जनता पक्षात आणून पवित्र करण्याचा प्रयत्न केला. त्यातला पहिला टप्पा होता त्यांना अजितदादांविरुद्ध बारामतीमध्ये २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत उतरवण्याचा. त्यानुसार तयारी सुरू झाली.
बारामती विधानसभा मतदारसंघात धनगर समाजाची संख्या लक्षणीय आहे. भाजपच्या जातीयवादी नेतृत्वाने हाच एक विचार करून पडळकर यांना उमेदवारी दिली. त्यापूर्वी एका लोकसभा निवडणुकीत भारिप बहुजन महासंघाच्या वतीने डॉ. महादेव काळे हे पवारांविरुद्ध उभे होते.काळे यांचे डिपॉझिट जप्त झाले, हे काही नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. तरीही गोपीचंद पडळकर यांना धनगर समाजाची एक गठ्ठा मते मिळतील या समजुतीत भाजपचे नेते होते. बारामतीमधील जातीय समीकरणे आणि तत्संबंधी लोकसंख्या याच्या पलीकडे भाजपच्या नेत्यांचे आकलन फार मोठे नव्हते. त्यामुळे अजितदादांविरुद्ध पडळकर यांना उमेदवारी देण्यात आली. त्यापूर्वी आणखीन एक खेळ भारतीय जनता पक्षाने केला होता. बारामती लोकसभा २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध भाजपने राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी देऊन निवडणूक रिंगणात उतरवले. त्या काळात कांचन कुल यांची भाषणे ज्यांनी ऐकली असतील किंवा वाचली असतील त्यातून त्यांना लक्षात आले असेल की, कोणत्या पात्रतेचा उमेदवार भाजपने सुप्रिया सुळेंसमोर उभा केला आहे!
हीच परिस्थिती २०१९ विधानसभा निवडणुकीत राहिली. पवारांच्या सत्तेला, प्रभुत्वाला शह द्यायचा ही भूमिका घेऊन भाजपचे नेते बारामतीत लढण्यासाठी आले आणि पुन्हा जे व्हायचे तेच झाले! गोपीचंद पडळकर यांचे डिपॉझिट जप्त झाले. त्यांना ३०,३७६ मते मिळाली. अजितदादांना १ लाख ९५ हजार ६४१ मते मिळाली. एक लाख ६५ हजार मतांची विक्रमी आघाडी घेऊन ते निवडून आले. भारतीय जनता पक्षाचे राज्यातील शीर्ष नेतृत्व अक्षरशः तोंडावर आपटल्यासारखे झाले!
या सगळ्या काळात अजितदादांनी शेजारच्या पुरंदर आणि इंदापूर या दोन्ही मतदारसंघांतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीचे उमेदवार यांना यश मिळवून दिले. एकूणच निवडणुकीच्या राजकारणातला त्यांचा प्रभाव देखील हा शरद पवारांसारखाच लक्षणीय ठरला, ही गोष्ट विसरता येणार नाही. अजितदादांच्या व्यक्तिमत्वाला खरे धुमारे फुटले ते २०१९ च्या अखेरीस. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महाविकास आघाडी स्थापन होऊन त्यांचे सरकार अस्तित्वात आले. या सरकारच्या स्थापनेनंतर जेमतेम तीन महिन्यातच संपूर्ण देशभर कोरोना लॉकडाऊन जाहीर झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जोडीला आरोग्य मंत्री राजेश टोपे कारभार पाहात होते.हे सरकार माया प्रयोगाने 2022 जूनमध्ये कोसळेपर्यंत, दादांनी उपमुख्यमंत्री म्हणून जी कामगिरी बजावली, ती निश्चितच लक्षणीय आणि प्रभावी अशा स्वरूपाची ठरली.
या काळात प्रकृती अस्वास्थ्यामुळे उद्धव ठाकरे फार फिरू शकत नव्हते, त्यांना काही मर्यादा होत्या. या परिस्थितीत जिल्हा नियोजन समितीच्या बैठका घेणे, विभागीय आयुक्त कार्यालयात जाऊन कामाचा लेखाजोखा बघणे, या सगळ्या गोष्टींकडे उपमुख्यमंत्री या नात्याने अजित पवार लक्ष ठेवत होते. एकूणच त्यांच्या कार्यक्षम कारभाराचा ठसा या काळात फार मोठ्या प्रमाणात उमटलेला महाराष्ट्राने पाहिला आहे. आता गेले वर्षभर ते विरोधी पक्षनेते म्हणून काम करत आहेत. त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत आणि महत्त्वाकांक्षांबाबत, माध्यमांमधून आणि राजकीय वर्तुळातून नेहमीच वादंग निर्माण झालेले आपण पाहत आहोत. त्यांनी स्वतः मुख्यमंत्री होण्याची आकांक्षा कधी लपवली नाही.
अगदी अलीकडेच काही माध्यमांना दिलेल्या मुलाखतीतही आपल्याला मुख्यमंत्री व्हायला आवडेल हे त्यांनी स्पष्टपणे सांगितले या सर्व या सर्व गोष्टी विचारात घेता आणि त्यांच्या कामाचा आवाका लक्षात घेता निश्चितपणे अजितदादा हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले लोकांना आवडतील यात शंका नाही. अजितदादा उपमुख्यमंत्री असताना मी काही वेळा मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस भवनमध्ये गेलो होतो. त्यावेळी ते दर गुरुवारी जनता दरबार भरवत असत. लोकांचे प्रश्न ताबडतोब कसे मार्गी लावता येतील, यासाठी ते प्रयत्नांची पराकाष्ठा करत. समोर तक्रारदार माणूस आलेला आहे, त्याचा अर्ज दादा वाचायचे. जवळ उभे असलेल्या स्वीय सहाय्यकाला सांगून संबंधित अधिकाऱ्याला फोन करायचे.
मग दादा त्याच्याशी बोलायचे, काय प्रश्न आणि तक्रार आहे हे सांगायचे आणि आठवडाभरात हा प्रश्न सुटला पाहिजे. मला ही तक्रार किंवा ही अडचण पुन्हा ऐकायला मिळायला नको, असे बजावून सांगायचे. समोर उभा असलेला माणूस, मी त्याचा चेहरा पाहायचो. तो माणूस मनामध्ये दिलासा आणि विश्वास घेऊन बाहेर पडायचा.
आज महाराष्ट्राचे राजकारण दिशाहीन स्वरूपाचे आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या निर्णयानंतरही महाराष्ट्राच्या राजकीय व्यवस्थेतील गोंधळ थांबलेला नाही! अशावेळी महत्वाकांक्षी असलेली व्यक्ती ही जणू काही अपराध करते आहे, या स्वरूपाचा एक दृष्टिकोन जेव्हा समोर दिसतो, तेव्हा काहीतरी बिनसले आहे हे लक्षात येते. अजित पवार आणि त्यांच्यासारखे काही कर्तबगार नेते महाराष्ट्राच्या आजच्या दिशाहीन राजकीय वातावरणात खूप काही करण्याची इच्छा असूनही हतबल आहेत.
महाराष्ट्राच्या राजकारणाला विकासाची दिशा आणि लोककेंद्रीत कारभार करण्याची धमक निश्चितपणे अजितदादांच्या व्यक्तिमत्वात दिसते. त्यांच्या काही बेलगाम वक्तव्याबाबत त्यांनी स्वतः प्रायश्चित्त देखील घेतले होते. त्यानंतर गेली काही वर्षे ते संयमाने वावरत आहेत, बोलत आहेत, ते देखील महाराष्ट्र पाहतो आहे.आज महाराष्ट्रातल्या राजकारणाची कोंडी ही अधिक जटील आहे आणि म्हणून लोकांच्यात थेट जाऊन, लोकांचे प्रश्न थेट सोडवून राजकारण करणारे अजित पवारांसारखे नेते या कोंडीत भिरभिरत आहेत का, असा प्रश्न पडतो. त्यातून ते बाहेर पडले पाहिजेत, तीच आपल्या सर्वांची सदिच्छा राहील. महाराष्ट्राच्या राजकारणाचा पोत हा जितक्या लवकर स्वच्छ आणि सरळ होईल, त्या प्रमाणात यातील अनेक गोष्टी आपल्यासमोर येतील.
सामन्य माणसे कोणत्याही राजकीय नेत्यांकडून जगण्याचे प्रश्न सोडवण्याची अपेक्षा करते. अजितदादांची महत्त्वाकांक्षा पुरी करणे हे तुमच्या, माझ्या हातात नाही, त्याचा निर्णय महाराष्ट्राची जनता करेल, पण तो निश्चित करेल, अशी शुभेच्छा आपण त्यांना देऊ यात. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घायुरारोग्य लाभो, अशी शुभकामना मी व्यक्त करतो.
अरुण खोरे, पुणे.
(ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक).
– बुधवार,दि.१४ जून,२०२३,पुणे.
