पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतरची पहिली कायदेशीर लढाई पुढील महिन्यात सुरु होणार आहे. येत्या सहा ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादीच्या दाव्यावरील केंद्रीय निवडणूक आयोगात पहिली सुनावणी होणार आहे. मात्र या सुनावणीदरम्यान, शरद पवार (Sharad Pawar) गटाला आणखी एक भगदाड पडणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. येत्या सहा तारखेला कोण खासदार, कोण आमदार कोणकडे या सगळ्याचे चित्र स्पष्ट होईल असं म्हणत खुद्द राष्ट्रवादी (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी मोठ्या घडामोडींचे संकेत दिले आहेत. (Ajit Pawar preparing to give another big blow to Sharad Pawar group)
सुनिल तटकरे आज (24 सप्टेंबर) पुण्यातील मंडईमधील गणपती बाप्पाच्या दर्शनाला आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी विविध विषयांवर संवाद साधला. दरम्यान, तटकरे यांच्या या वक्तव्याने मोठा सस्पेन्स तयार केला आहे.
राजकीय वर्तुळात शरद पवार गटातील एक खासदार अजितदादांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. पण हे खासदार नेमके कोण, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. यावर बोलताना तटकरे म्हणाले, सहा तारखेला जी काही दिल्लीमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सुनावणी आहे त्यावेळेला सगळं चित्र स्पष्ट होईल. किती खासदार, कोण खासदार, किती आमदार, नेमके कोण आमदार हे सगळं आपल्याला चित्र त्या दिवशी पाहायला मिळेल. यात नागालँड, झारखंड इथल्या सुद्धा आमदारांची भूमिका काय आहे ती सुद्धा आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये नक्कीच पाहायला मिळेल.
मागील अनेक दिवसांपासून अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाची चर्चा सुरु आहे. अशात एकनाथ शिंदे आणि 16 आमदारांच्या अपात्रतेची याचिका सुनावणीसाठी येत आहे. या याचिकेचा निकाल शिंदेच्या विरोधात लागल्यास मुख्यमंत्रीपदी अजितदादा येणार अशा चर्चा होत आहे. यावर बोलताना सुनिल तटकरे म्हणाले, दादा मुख्यमंत्री व्हावेत ही आम्हा सर्वांचीच भावना आहे. मात्र आम्ही वास्तववादी आहोत. शेवटी प्रत्येक गोष्टीला काळ वेळ आणि वेळ यावी लागत असते, असे त्यांनी सांगितले.
बारामती, शिरूर, रायगड, सातारा असो, महाराष्ट्रामध्ये आज महायुतीमध्ये आम्हाला ज्या जागा लढवायच्या आहेत, त्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजितदादा आणि त्यांचे सर्व सहकार्य पहिल्यांदा पक्षांतर्गत बसू आणि घेऊ. त्यानंतर स्वाभाविक पणे भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि इतर घटक यांच्याजवळ बसून आम्ही नेमक्या जागा कुठला लढवायच्या याबाबत ठरवू. त्यानंतर बारामतीचा उमेदवार असेल किंवा इतर ज्या जागा आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एनडीएमधून लढवेल.