Letsupp Special : शरद पवारांनी अदानी समुहाच्या ‘ज्या’ प्रकल्पाचे उद्घाटन केले तिथे काय तयार होणार?
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी नुकतीच उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांची भेट घेतली. पवारांनी गुजरातमध्ये अदानी यांच्या एका प्रकल्पाचे उद्घाटन केले, यावेळी ही भेट झाली होती. या भेटीवरुन राज्यात आणि देशात बरंच राजकारण पाहायाल मिळालं. विरोधकांच्या निशाण्यावर असणाऱ्या अदानींची ही पवार यांची वर्षातील तिसरी भेट ठरली. त्यामुळे विरोधकांच्या आघाडीत चुकीचा संदेश जात असल्याचे म्हणत काँग्रेसने या भेटीवर टीका केली. भाजपनेही या भेटीवर पवारांना सवाल विचारले. (India’s first Lactoferrin Plant Exympower was inaugurated in Vasna, Chacharwadi, Gujarat by NCP chief Sharad Pawar and Adani Group Chairman Gautam Adani)
मात्र या भेटीतील राजकीय दृष्टीकोन बाजूला ठेवून पवारांनी अदानींच्या ज्या प्रकल्पाचे उद्घाटन केले तिथे नेमके काय तयार होणार असा सवाल अनेक जण विचारत आहेत. तर या प्रश्नाचे उत्तर काल (23 सप्टेंबर) खुद्द शरद पवार यांनीच दिले आहे. “गौतम अदानी यांच्यासमवेत वसना, चाचरवाडी, गुजरात येथे भारतातील पहिल्या लॅक्टोफेरिन प्लांट एक्झिमपॉवरचे उद्घाटन करणे हा विशेष बहुमान होता” असे पवार यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे. थोडक्यात पवार यांनी लॅक्टोफेरिन प्लांट एक्झिमपॉवरचे उद्घाटन केले.
It was a privilege to inaugurate India’s first Lactoferrin Plant Exympower in Vasna , Chacharwadi , Gujarat along with Mr. Gautam Adani pic.twitter.com/G5WH9FaO5f
— Sharad Pawar (@PawarSpeaks) September 23, 2023
लॅक्टोफेरिन प्लांट एक्झिमपॉवर काय असते?
लॅक्टोफेरिन हे आईच्या, गाईच्या आणि सस्तन प्राण्यांच्या दुधात आढळणारे एक प्रथिन आहे. हे लाळ, अश्रू, कफ आणि पित्तामध्ये देखील आढळून येते. बाळाच्या जन्मानंतर आईच्या दुधात लैक्टोफेरिनचे प्रमाण सर्वाधिक असते. लॅक्टोफेरिनमुळे बाळाचा पाहिल्या सहा महिन्यात तरी ॲनिमियापासून बचाव होतो. तसेच हे लॅक्टोफेरिन काही विशिष्ट विषाणू, जीवाणूंबरोबरही लढून, बाळाचे या संसर्गातून संरक्षण करते. लॅक्टोफेरिनमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास, जळजळ कमी करण्यास आणि आतड्याचे आरोग्य राखण्यास मदत होते. बरेच लोक लॅक्टोफेरिन सप्लिमेंट्स देखील घेतात. त्यात अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असल्याचा दावा केला जातो.
अदानींच्या प्लांटमध्ये दरवर्षी होणार 100 टन लॅक्टोफेरिनचे उत्पादन :
शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन झालेला लॅक्टोफेरिन प्लांट एक्सिमपॉवर हा भारतातील पहिला प्लांट आहे. एक्झिमियस आणि अदानी समूहाच्या संयुक्त भागीदारीतून हा हा प्लांट उभारण्यात आला आहे. दरवर्षी 100 टन लॅक्टोफेरिन उत्पादन करण्याचे उद्दिष्ट्य या प्लांटमधून ठेवण्यात आले आहे. शरद पवार यांनी अदानी समूहाने प्लांटमध्ये केलेल्या गुंतवणुकीचे कौतुक केले. या प्लांटमुळे रोजगार निर्मिती आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यास मदत होईल. एक्झिमपॉवर प्लांट हा भारतीय दुग्ध उद्योगासाठी महत्त्वपूर्ण विकास आहे. यामुळे भारताला लॅक्टोफेरिन उत्पादनात स्वयंपूर्ण होण्यास मदत मिळे आणि आणि ते उत्पादन ग्राहकांना अधिक परवडणारे बनेल, असेही त्यांनी सांगितले.