विमान आता लँडिंग होणार आहे तुम्ही आलात का?; शेवटचा फोन आणि अंगरक्षकाच्या डोळ्यासमोरच कोसळले विमान

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान लँडींगसाठी काही क्षणांवर असतानाच त्यांच्या अंगरक्षकाशी फोनवरून शेवटचा संवाद झाला.

Untitled Design (336)

Untitled Design (336)

Ajit Pawar’s last call to his bodyguard before the accident : बारामती विमानतळ परिसरात काल सकाळच्या सुमारास घडलेला प्रसंग अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारा ठरला. मुंबईहून बारामतीकडे येणाऱ्या खासगी चार्टर विमानातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा प्रवास सुरू होता. विमान लँडींगसाठी काही क्षणांवर असतानाच अजित पवार यांचा त्यांच्या अंगरक्षकाशी फोनवरून शेवटचा संवाद झाला होता.

विमान आता लँडिंगला येत आहे, तुम्ही पोहोचलात का? असा प्रश्न अजित पवार यांनी विचारल्याचे सांगितले जाते. महेश बोबडे आणि इम्तियाज मोमीन हे दोघे अंगरक्षक वाहनांच्या ताफ्यासह विमानतळ परिसरात उपस्थित होते. काही क्षणांतच त्यांच्या डोळ्यासमोरच विमानाचा तोल गेला आणि ते धावपट्टीजवळील शेतात कोसळले. सुरूवातीला हे एखादे छोटे किंवा शिकाऊ विमान असावे, असा अंदाज अंगरक्षकांनी व्यक्त केला. मात्र काही क्षणांतच GPS आणि विमान क्रमांकाची खात्री झाल्यानंतर कोसळलेले विमान हेच अजित पवार यांचे असल्याचे स्पष्ट झाले. ही जाणीव होताच दोन्ही अंगरक्षकांना मोठा मानसीक धक्का बसला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारांचा प्रोटोकॉल काय? सर्वसामान्य नागरिक सहभागी होऊ शकतात का?

घटनेची तीव्रता लक्षात घेता, भाणांसह घटनास्थळी असलेल्या अंगरक्षकांनी आणि स्थानिकांनी तातडीने मदतकार्य सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र अपघात इतका भीषण होता की, विमानाचा अक्षरशः चक्काचूर झाला होता. आगीचे लोळ, धूर आणि विखुरलेले अवशेष पाहून घटनास्थळी एकाच गोंधळ उडाला. प्राथमिक माहितीनुसार या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली होती. मात्र काही वेळातच अजित पवार यांचा अपघातात मृत्यू झाला असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली.

दरम्यान लँडिंगदरम्यान घडलेल्या या दुर्घटनेने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. या अपघाताच्या कारणांचा तपास सुरू असून, हवामान, तांत्रिक बिघाड की मानवी चूक, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. नागरी विमान वाहतूक विभागाकडून सविस्तर चौकशीचे आदेश देण्यात येण्याची शक्यता आहे. या घटनेने राजकीय वर्तुळासह संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला असून, पुढील काही तासांत अधिकृत माहिती समोर येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version