भाजप नेते शिवाजीराव कर्डिले (Kardile) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी येत्या 23 एप्रिलला मतदान होणार आहे. तर 4 मे रोजी या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होईल. राहुरी विधानसभा मतदारसंघात भाजपने दिवंगत नेते शिवाजीराव कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी दिली आहे. यावेळी त्यांनी प्रतिज्ञापत्रात आपली संपत्ती नमूद केली आहे.
ऍफिडेव्हिटमध्ये नमूद केल्याप्रमाणे, कर्डीले यांच्या नावावर सुमारे ₹2.79 कोटींची मालमत्ता आहे. त्यांच्या पत्नीच्या नावावर सुमारे ₹6.65 लाखांची मालमत्ता नमूद करण्यात आली असून हिंदू अविभक्त कुटुंब (HUF) अंतर्गत सुमारे ₹13.22 लाखांची मालमत्ता दाखवण्यात आली आहे. मालमत्तेच्या तपशीलावर नजर टाकल्यास, कर्डीले यांच्या नावावर वाळकवाडी तसेच नगरदेवळे परिसरात शेतीजमीन आहे.
वाळकवाडी येथील जमिनीची किंमत सुमारे ₹49.98 लाख तर इतर जमिनींची किंमत सुमारे ₹33.30 लाख इतकी नमूद करण्यात आली आहे. यावरून त्यांच्या एकूण संपत्तीत शेतीजमिनीचा मोठा वाटा असल्याचे स्पष्ट होते. चल मालमत्तेमध्ये विविध बँक खात्यांमधील ठेवींचा समावेश असून कर्डीले यांच्या नावावर लाखो रुपयांच्या ठेवी असल्याचे दिसते. तसंच, त्यांच्या हातातील रोख रक्कम सुमारे ₹26.96 लाख इतकी नमूद करण्यात आली आहे.
पत्नीच्या नावावरही सुमारे ₹6.72 लाखांची रोख रक्कम दाखवण्यात आली आहे. दागदागिन्यांच्या बाबतीत, कर्डीले यांच्या नावावर सोन्याचे दागिने व इतर मौल्यवान वस्तू मिळून सुमारे ₹40 लाखांहून अधिक किमतीची मालमत्ता असल्याचे नमूद आहे. पत्नीच्या नावावरही काही दागिने दाखवण्यात आले आहेत. याशिवाय फर्निचर व घरगुती साहित्य सुमारे ₹2.02 लाखांचे असून इतर साठा (स्टॉक) सुमारे ₹28.40 लाखांचा असल्याचे ऍफिडेव्हिटमध्ये नमूद आहे.
आयकर विवरणानुसार, गेल्या पाच वर्षांत कर्डीले यांचे वार्षिक उत्पन्न सुमारे ₹4.5 लाख ते ₹19.6 लाखांच्या दरम्यान राहिले आहे. पत्नीचे उत्पन्न बहुतांश वर्षांमध्ये निरंक असून एका वर्षात सुमारे ₹6.70 लाखांचे उत्पन्न दाखवण्यात आले आहे. एकूणच, अक्षय शिवाजी कर्डीले यांच्या ऍफिडेव्हिटमधून त्यांची आर्थिक स्थिती भक्कम असल्याचे स्पष्ट होत असून शेतीजमीन, बँक ठेवी आणि दागदागिने या प्रमुख घटकांवर त्यांची संपत्ती आधारित असल्याचे दिसून येते.
