राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीतून अखेर प्राजक्त तनपुरे यांची माघार; अक्षय कर्डिलेंच्या बिनविरोधाचा मार्ग मोकळा ?
Rahuri Assembly By Election-तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज न भरता माघार घेतली आहे. त्यामुळे भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्यासाठी ही निवडणूक सोपी झाली आहे.
Rahuri Assembly By Election : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीतून (Rahuri Assembly By Election) माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी माघार घेतली आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी तनपुरे यांची भेट घेत शिष्टाई केली. त्यानंतर तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज न भरता माघार घेतली आहे. त्यामुळे भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्यासाठी ही निवडणूक सोपी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून गोविंद मोकाटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गोविंद मोकाटे हे मूळचे ठाकरे सेनेचे आहेत.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे भाजप उमेदवार अक्षय कर्डिले यांचा उमेदवार अर्ज भरण्यासाठी राहुरीत दाखल झाले होते. कर्डिलेंचा अर्ज दाखल करण्यापूर्वी रविंद्र चव्हाण व राधाकृष्ण विखे पाटील हे थेट तनपुरे यांच्या संपर्क कार्यालयात दाखल झाले. त्यामुळे मोठी राजकीय घडामोड सुरू झाली. विखे व चव्हाण यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्क साधला. त्यानंतर फडणवीस आणि तनपुरे यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाली आहे. या संभाषणात राहुरी मतदारसंघातील विकासाच्या प्रश्नांवर सकारात्मक भूमिका घेतली गेली.
बारामती दादांसाठी आईसारखी होती; उमेदवारी दाखल करण्यापूर्वी सुनेत्रा पवारांनी केलं मन मोकळं
त्यानंतर तनपुरे म्हणाले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि पालकमंत्र्यांनी त्यांना विनंती केली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकासकामांबाबत सकारात्मक आश्वासन दिले आहे. मात्र अंतिम निर्णय घेण्यापूर्वी कार्यकर्त्यांशी चर्चा करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. माझा उमेदवारी अर्ज भरून तयार आहे. ज्या मुद्द्यांवर निवडणूक लढवायची आहे, तेच प्रश्न सोडवण्याची तयारी सरकारने दाखवली असेल, तर मला सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा लागेल, असे तनपुरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. त्यानंतर तनपुरे यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेत उमेदवारी अर्जच दाखल केला आहे.
राष्ट्रवादीकडून गोविंद मोकाटे उमेदवार
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून गोविंद मोकाटे यांनी एेनवेळी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना मोकाटे यांनी एबी फॉर्मही जोडलेला आहे. गोविंद मोकाटे यांची मुलगी जिल्हा परिषद सदस्य होत्या. जिल्हा परिषद निवडणुकीच्या दरम्यान नगर तालुक्यात पांगरमल दारूकांड झाले होते. निवडणुकीच्या वेळी वाटलेल्या बनावट दारूमुळे गावातील दहा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्याप्रकरणी मोकाटे यांच्या मुलीसह अनेकांवर गुन्हे दाखल झाले होते. आता गोविंद मोकाटे यांनीच राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. ते ठाकरे सेनेकडून इच्छुक होते. परंतु सेनेकडून उमेदवारी मिळाली नाही.
तगडा उमेदवार नसल्याने अक्षय कर्डिलेंसाठी निवडणूक सोपी
मागील वेळी शिवाजीराव कर्डिले आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांच्यामध्ये लढत झाली होती. त्यात कर्डिले हे विजयी झाले आहे. 2009 पासून 2024 पर्यंत कर्डिले विरुद्ध तनपुरे अशीच या मतदारसंघात निवडणूक झालेली आहे. पोटनिवडणुकीत मात्र तनपुरे यांनी माघार घेतलेली आहे. वंचित, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांनी उमेदवार दिलेत. परंतु तसा तगडा उमेदवार कर्डिलेंविरोधात नाही. त्यामुळे अक्षय कर्डिलेंसाठी ही निवडणूक सोपी झाली आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी आणखी तीन दिवस आहेत. त्यामुळे आणखी काही राजकीय घडामोडी घडूनही निवडणूक बिनविरोध होऊ शकते.