‘टॉम हॉलंड खूपच…’; स्पायडर-मॅनच्या सेटवरील अनुभवाबद्दल सॅडी सिंकची मनमोकळी कबुली
चित्रपटाच्या प्रदर्शनाला महिनाभराचा कालावधी उरला असताना, स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे संदर्भातील प्रत्येक अपडेटकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
Sadie Sink’s candid admission : स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे हा चित्रपट 30 जुलै रोजी भारतात प्रदर्शित होणार असून तो इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये पाहायला मिळणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाला आता अवघा महिनाभराचा कालावधी उरला असताना, स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे संदर्भातील प्रत्येक नव्या अपडेटकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. दिग्दर्शक डेस्टिन डॅनियल क्रेटन यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेल्या या चित्रपटातून टॉम हॉलंड पुन्हा एकदा स्पायडर-मॅनच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र मागील चित्रपटातील घटनांनंतर जगाला पीटर पार्करची ओळख विसरली गेली आहे. त्यामुळे हा लोकप्रिय सुपरहिरो आता पूर्णपणे नव्या वास्तवात स्वतःचा मार्ग शोधताना दिसणार आहे.
या चित्रपटातील आणखी एक चर्चेचा विषय म्हणजे अभिनेत्री सॅडी सिंक. ती या चित्रपटात एका रहस्यमय भूमिकेत दिसणार असून तिच्या पात्राबाबतची माहिती अद्याप गुप्त ठेवण्यात आली आहे. मात्र नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सॅडीने टॉम हॉलंड आणि स्पायडर-मॅनच्या टीमसोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला. नायलॉनला दिलेल्या मुलाखतीत सॅडी म्हणाली, “त्या वातावरणात नव्याने प्रवेश करणे आणि काही प्रमाणात बाहेरची व्यक्ती असल्यासारखे वाटणे हा एक वेगळाच अनुभव होता.
शरद पवारांच्या पक्षात सर्व काही आलबेल नाही? 5 ते 6 खासदार अस्वस्थ असल्याचा पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
पण टॉम हॉलंडने माझे अतिशय मनापासून स्वागत केले. संपूर्ण टीमच खूप सहकार्य करणारी होती. टॉम खूप शांत, मोकळा आणि सहज स्वभावाचा आहे. त्यामुळे मला तिथे काम करताना खूपच आरामदायी वाटले.” मार्व्हल आणि विशेषतः स्पायडर-मॅन मालिकेचा प्रचंड चाहता वर्ग असल्याची जाणीव असल्याचेही तिने सांगितले. “या चित्रपटांचा चाहता वर्ग किती मोठा आहे याची मला कल्पना होती. पण प्रत्यक्षात हा सगळा अनुभव खूपच भव्य वाटतो. अशा मोठ्या बजेटच्या चित्रपटांची दुनिया पूर्णपणे वेगळी असते,” असे सॅडीने नमूद केले.
सोनी पिक्चर्स एंटरटेनमेंट इंडिया प्रस्तुत स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे हा चित्रपट 30 जुलै रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.