भगवान श्रीकृष्णांप्रमाणे कोणत्याही बालकाचा जन्म तुरुंगात होऊ नये; निदा खानला जामीन देताना न्यायाधीशांचा दाखला

Nida Khan : तुरुंगात जन्माला येणाऱ्या मुलाला आयुष्यभर सामाजिक कलंक आणि मानसिक आघात सहन करावा लागू नये-कोर्ट

  • Written By: Published:
Nidha Khan Tcs Case

Nashik Court While Granting Bail To Nida Khan In TCS Case : नाशिक येथील टीसीएस कंपनीतील ( TCS Case) लैंगिक शोषण, धर्मांतर आणि धार्मिक भावना दुखाविल्याच्या गुन्ह्यात निदा खानला (Nida Khan) सोमवारी जामीन मंजूर झाला आहे. तिला जामीन दिल्याची सविस्तर ऑर्डर गुरुवारी आली आहे. त्यात नाशिक जिल्हा न्यायालयाच्या (Nashik Court) न्यायाधीशांनी थेट भगवान श्रीकृष्ण यांच्या जन्माचा दाखला दिला आहे.

तुरुंगात जन्माला येणाऱ्या मुलाला आयुष्यभर सामाजिक कलंक आणि मानसिक आघात सहन करावा लागू नये. भगवान श्रीकृष्णांप्रमाणे कोणत्याही बालकाला अशा परिस्थितीत जन्म घ्यावा लागू नये, अशी टिप्पणी न्यायालयाने केली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश केदार जोशी यांनी 6 दिलेल्या आदेशात नमूद केले की, तपासात निदा खानविरोधात काही प्राथमिक पुरावे असले तरी ती पाच महिन्यांची गर्भवती आहे. तिच्या गर्भातील बाळाच्या हिताचा विचार करून न्यायालयाने जामीन मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे.

अर्जदार पाच महिन्यांची गर्भवती असल्याबाबत कोणताही वाद नाही. भगवान श्रीकृष्णांप्रमाणे कोणत्याही बालकाचा जन्म तुरुंगात होऊन त्याला सामाजिक कलंक किंवा मानसिक आघात सहन करावा लागू नये. गर्भातील बाळाचे हित, त्याचे योग्य संगोपन आणि अशा परिस्थितीपासून त्याचे संरक्षण करण्यासाठी न्यायालयाने विवेकाधिकाराचा वापर करून अर्जदाराला जामीन देणे योग्य ठरेल. आवश्यक अटी घालून सरकारी पक्षाच्या हिताचेही संरक्षण करता येऊ शकते, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.

तपासात काय समोर आले?
तपासादरम्यान सहआरोपी दानिश आणि तौसिफ यांनी निदा खानच्या मदतीने पीडितेच्या धार्मिक आणि वैचारिक श्रद्धा बदलण्याचा प्रयत्न केला. हिंदू धर्मातील कथांबाबत आक्षेपार्ह माहिती देऊन तिच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आहे.
तसेच, भगवान शिव, भगवान श्रीकृष्ण आणि भगवान ब्रह्मा यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करून पीडितेच्या धार्मिक भावना दुखावल्याचाही आरोप आहे.निदा खानने पीडितेला बुरखा दिला होता. तसेच आरोपींनी तिला प्रेषित मोहम्मद यांच्या जीवनावरील पुस्तक दिले होते. याशिवाय निदा खान पीडितेच्या घरी जाऊन तिला नमाज अदा करण्याचे आणि इतर धार्मिक विधींचे प्रशिक्षण देत असल्याचेही तपासातून समोर आलेले आहे.


जामीन देण्यामागील कारणे

निदा खानकडून आता कोणतीही वस्तू जप्त करायची किंवा पुढील तपासासाठी तिची कोठडी आवश्यक नाही. सरकारी पक्षानेही तिच्या पुढील पोलीस कोठडीची मागणी केलेली नाही. याशिवाय या प्रकरणाचा खटला पूर्ण होण्यासाठी बराच कालावधी लागू शकतो. त्यामुळे तिला कोठडीत ठेवण्यात कोणताही उपयोग नसल्याचे न्यायालयाने नमूद केले. त्यामुळे न्यायालयाने 75 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीनावर निदा खानची सुटका करण्याचे आदेश दिले. आठ जुलै रोजी निदा खानने पुन्हा न्यायालयात अर्ज दाखल केला. आपण आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्याने 75 हजार रुपयांचा जामीन भरू शकत नसल्याचे सांगत रक्कम कमी करण्याची विनंती केली. सरकारी पक्षाने या मागणीला विरोध केला. मात्र, दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने जामीनाची रक्कम 75 हजार रुपयांवरून 50 हजार रुपये इतकी कमी करण्याचा आदेश दिला.

follow us