मराठवाडा मुक्ती संग्रामाचे ( Marathwada Liberation War ) यंदा अमृतमहोत्सवी ( Nectar Festival ) वर्ष आहे. त्यामुळे हे वर्ष भव्य प्रमाणात साजरे व्हावे, अशी महाराष्ट्रवासियांची भावना आहे, असे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी ( Ajit Pawar ) म्हटले आहे. यावेळी ते विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत बोलत होते. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ( Budget Session ) दिनांक 27 फेब्रुवारीपासून पासून विधान भवन, मुंबई येथे सुरु होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली.
यावेळी अजित पवारांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने अर्थसंकल्पात 500 कोटींची घोषणा केली होती, त्याची आठवण करुन दिली. तसेच हा कार्यक्रम मराठवाड्यासह महाराष्ट्रातील नागरिक तसेच सर्वपक्षीय नेत्यांना सोबत घेऊन करावा असे आवाहन त्यांनी केले. याचबरोबर मराठवाडा मुक्तीचा संघर्ष नव्या पिढीपर्यंत घेऊन जावा, हा त्यामागचा प्रमुख उद्देश आहे, असेही अजित पवार म्हणाले.
मराठवाडा मुक्ती संग्रामाला मोठा इतिहास आहे. स्वातंत्र्यापूर्वी हैद्राबाद संस्थान हे स्वतंत्र होते. त्याठिकाणी निजाम राज्य करीत होता. मराठवाडा, आंध्र प्रदेश व तेलंगणाचा काही भाग त्यामध्ये येत होता. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतरही या ठिकाणावर निजामाचे राज्य होते. त्याकाळात मराठवाड्यातील स्वामी रामानंद तीर्थ, गोवंद भाई श्रॉफ आदी नेत्यांनी मराठवाडा मुक्त व्हावा यासाठी संघर्ष केला.
दरम्यान हे अधिवेशन किमान पाच आठवड्यांचे तरी घ्यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केली आहे. नागपूरचे हिवाळी अधिवेशन किमान तीन आठवडे घेण्याची विरोधी पक्षांनी मागणी केली असतानाही हिवाळी अधिवेशन तीन आठवडे घेण्यात आले नाही. त्यामुळे राज्यातील सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन किमान पाच आठवड्याचे घ्यावे, असे पवारांनी म्हटले आहे.