मुंबई : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंडखोरीत साथ देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना 25 कोटींचा बक्कळ निधी दिला आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाच्या आमदारांची नाराजी उफाळून येणार नाही याची काळजी घेत त्यांच्याही वाट्याचा निधी त्यांना देऊन टाकला आहे. दरम्यान, अजित पवार यांच्या या निर्णयानंतर शिवसेना (UBT) गटाचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danvse) यांनी शिवसेना (UBT) आमदारांना वर्षभरात कोणताही निधी न मिळाल्याचा दावा करत उपमुख्यमंत्री आणि तत्कालिन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सापत्न वागणूक दिल्याचा मोठा आरोप केला आहे. (Ambadas Danve alleged that the Shiv Sena (UBT) MLAs did not receive any funds during the year)
ठाकरे गटाच्या आमदारांना या वर्षात कोणताही निधी देण्यात आलेला नाही. जिल्हा नियोजन समित्यांवर सापत्न वागणूक दिली जात आहे. जो निधी मंजूर झाला होता, त्याला दिलेली स्थगिती अद्यापही उठवलेली नाही. ही भूमिका चुकीची आहे. अधिवेशनात हा मुद्दा मांडला जाईल. काही जण न्यायालयात गेलेले आहे. पण माझं असं मत आहे की, तिथं जनता राहतं नाही का? 100 टक्के लोकं काय तुम्हालाच मतदान करणारे होते का? तुम्हालाही मतदान करणारे होतेच ना काही ना काही, तुम्हालाही मानणारे असतील ना काही. आम्ही म्हणत नाही आम्हालाही 50 कोटी द्या. त्यांना 50 दिले, आम्हाला 40 द्या, 30 द्या, 20 द्या. परंतु अशा पद्धतीने निधीचे वाटप होतं असेल तर ते अन्यायकारक आहे.
कारण आपला वैचारिक विरोध आहे. वैक्तिगत वैर नसायला पाहिजे. जर असं ठेवतं असेल तर तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. आम्ही लोकांना सांगू हे निधी देतच नाहीत. लोकं तुम्हालाच शिव्या देतील. फक्त आमदार निधी आहे, त्यावरच आमदारांचं सुरु आहे. बाकीचा निधी येतच नाही. अधिवेशन चालू आहे, हिशोब द्यावा. विधानसभेत नसेल द्यायचं तर एखादं प्रसिद्धीपत्रक काढावं. विधानसभेतील 288 आणि विधान परिषदेत जे काही 58-59 आमदार आहेत त्यांना किती निधी दिला याचा हिशोब देवेंद्र फडणवीस यांनी द्यावा. पण आपण महाराष्ट्रातील शिवसेना, काँग्रेसच्या आमदारांना सापत्नतेची वागणूक दिली आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांनाही देत होता, ते आता तुमच्याकडे आले की त्यांना निधी देण्यात आला आहे. त्यामुळे आम्ही आमच्या आरोपांवर ठाम आहोत, असेही दानवे म्हणाले.
अर्थमंत्री अजित पवार यांनी बंडखोरीत साथ देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना २५ कोटींचा बक्कळ निधी दिला आहे. विशेष म्हणजे, जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्याही मतदारसंघांसाठी अजितदादांनी निधी दिला आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाच्या आमदारांची नाराजी उफाळून येणार नाही याची काळजी घेत त्यांच्या वाट्याचा निधी त्यांना देऊन टाकला. विधीमंडळात सादर करण्यात आलेल्या पुरवणी मागण्यांमध्ये भाजप-शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या आमदारांच्या मतदारसंघांतील विकासकामांसाठी दीड हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.