Murder In Pandharpur Over a Dispute : पंढरपूर तालुक्यात प्रेमप्रकरणातून (Crime) झालेल्या वादाचे पर्यवसान 70 वर्षीय वृद्धाच्या हत्येत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंबादास खांडेकर यांची हत्या करून मृतदेह शेतात अर्धवट जाळण्यात आला होता. मृतदेहाची ओळख पटत नसल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. अखेर DNA चाचणीच्या अहवालातून मृतदेहाची ओळख पटली आणि त्यानंतर पोलिसांनी अवघ्या 12 तासांत या प्रकरणातील आरोपी मंगल होनमाने हिला अटक केली.
अंबादास खांडेकर आणि मंगल होनमाने यांच्यात गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. 27 जुलै रोजी दोघांमध्ये कोणत्यातरी कारणावरून वाद झाला. हा वाद वाढत गेल्यानंतर मंगल हिने शेतात अंबादास यांच्यावर हल्ला करून त्यांची हत्या केल्याचा आरोप आहे. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह अर्धवट जाळून मंगल घटनास्थळावरून निघून गेल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.
आयआयटी विद्यार्थी मृत्यूप्रकरणी अखेर प्राध्यापकांचं निलंबन! गुन्हा दाखल झाल्यानंतर मोठी कारवाई
दरम्यान, 2 ऑगस्ट रोजी परिसरातील एका शेतात अर्धवट जळालेल्या अवस्थेत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाची अवस्था आणि ओळख पटवण्यासाठी उपलब्ध पुरावे नसल्याने पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान निर्माण झाले. तपासादरम्यान अंबादास खांडेकर यांच्या दोन मुलींचे DNA नमुने घेण्यात आले. हे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आल्यानंतर अहवालाची प्रतीक्षा सुरू होती.
तब्बल दीड महिन्यानंतर DNA अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृतदेह अंबादास खांडेकर यांचाच असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पंढरपूर पोलिसांनी तपासाला वेग देत तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे मंगल होनमाने हिचा शोध घेतला. अवघ्या 12 तासांत तिला ताब्यात घेण्यात आले. पोलिस चौकशीत प्रेमप्रकरणातील वादातून हत्या केल्याची कबुली तिने दिल्याची माहिती समोर आली असून, या घटनेमुळे पंढरपूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
