वादग्रस्त जाहिरातीनंतर अमित ठाकरेंचा भावेश कावरेंना जाब, कावरेचा माफीनामा

या संपूर्ण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे आणि भावेश कावरे यांचा तीन वर्षांपूर्वीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

News Photo   2026 08 16T181314.358

वादग्रस्त जाहिरातीनंतर अमित ठाकरेंचा भावेश कावरेंना जाब, कावरेचा माफीनामा

मुंबईतील ताडदेव परिसरातील घराच्या संदर्भात ‘मांसाहारींना घर नाही, शाकाहारींचे स्वागत’ अशी जाहिरात केल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या भावेश कावरे याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी चांगलेच सुनावले. या जाहिरातीमुळे सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यानंतर कावरेने स्पष्टीकरण देत दिलगिरी व्यक्त केली होती. मात्र, या संपूर्ण प्रकाराची गंभीर दखल घेत अमित ठाकरे यांनी त्याला भेटीसाठी बोलावून जाब विचारला.

‘तू जे बोललास ते अत्यंत चुकीचे आहे. मुंबईतील प्रश्नांकडे लोकांचे लक्ष केंद्रित होत असताना अशा वक्तव्यांमुळे त्यांना भरकटवले जाते,’ अशा शब्दांत अमित ठाकरे यांनी कावरेला खडसावले. प्रसिद्धी आणि पैशांसाठी विनाकारण सामाजिक तणाव निर्माण करण्याची गरज नव्हती, असेही त्यांनी सुनावले. चांगले काम करत असताना आपणच कावरेला बोलावले होते, त्यामुळे कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या टाळाव्यात, याचे भान त्याने ठेवायला हवे होते, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

जाहिरातीवरून वाद निर्माण झाल्यानंतर त्याचे ‘कव्हर अप’ करण्यासाठी रील्स बनवण्यापेक्षा अशी चूक सुरुवातीलाच होऊ नये, याची काळजी घेणे आवश्यक होते, असेही अमित ठाकरे यांनी सांगितले. धर्म किंवा जातीवरून कोणालाही लक्ष्य करू नये. तरुणांचा वापर करून त्यांना चुकीच्या दिशेने भरकटवले जाऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला. त्यानंतर कावरेला या प्रकाराबद्दल सर्वांची माफी मागण्यास सांगण्यात आले.

ताडदेव घरविक्री वादाला नवं वळण; ‘मांसाहाऱ्याला घर नको’ म्हणणारा मालक मराठीच!

अमित ठाकरे यांच्या भेटीनंतर भावेश कावरेने माध्यमांसमोर येत माफीनामा दिला. ‘मी मुंबईकरांची माफी मागतो. माझ्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल दिलगीर आहे. तसेच मनसे आणि अमित ठाकरे यांचीही माफी मागतो. मला हा वाद पुढे वाढवायचा नाही. मी मराठी माणसाला घर देत आहे आणि पुढेही देत राहणार आहे. ही जाहिरात केल्यानंतर एवढा वाद निर्माण होईल, असे वाटले नव्हते,’ असे कावरेने स्पष्ट केले.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे आणि भावेश कावरे यांचा तीन वर्षांपूर्वीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातील हा व्हिडिओ असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्या कार्यक्रमात मनसेकडून एका कंटेन्ट क्रिएटरचा सत्कार करण्यात आला होता. यावेळी अमित ठाकरे आणि भावेश कावरे एकत्र दिसत असल्याने जुन्या व्हिडिओचीही सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

Exit mobile version