दगडूशेठच्या दर्शनासाठी अमित ठाकरेंची हजेरी; राज ठाकरेंबद्दल गणरायाच्या चरणी केली ‘ही’ प्रार्थना
Amit Thackeray Ganpati Darshan : अमित ठाकरेंनी पुण्यात गणेशोत्सवाच्या निमित्ताने बाप्पाचे दर्शन घेतल आणि राज ठाकरे यांच्यासाठी साकडं घातलं.
रविवार आणि सुट्टीचा दिवस असल्याने (Pune) पुण्यात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली असून मंदिराबाहेर सुमारे 500 मीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत. पुण्यासह ग्रामीण भाग आणि इतर राज्यांतूनही भाविक बाप्पाच्या दर्शनासाठी तसेच शहरातील विविध गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी दाखल झाले आहेत.
यंदा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाकडून वृंदावनच्या प्रसिद्ध ‘प्रेम मंदिरा’ची 135 फूट उंच भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे. पुण्यातील सर्वात उंच मंदिर अशी या देखाव्याची ओळख निर्माण झाली असून आकर्षक रोषणाईमुळे परिसर उजळून निघाला आहे. त्यामुळे दर्शनासोबतच हा देखावा पाहण्यासाठीही भाविकांची गर्दी होत आहे.
अमित ठाकरेंच्या मोदी फोटो वादावर राज ठाकरेंची भूमिका; फोटो लावा पण तो दुसऱ्या भिंतीवर
दरम्यान, मनसे नेते अमित ठाकरे यांनी पुण्यातील विविध गणेश मंडळांना भेटी देत बाप्पाचे दर्शन घेतले. पारंपरिक फेटा बांधून ते दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी पोहोचले. जुन्या काळातील उत्साह आणि परंपरा जपत गणेशोत्सव पुन्हा मोठ्या उत्साहात साजरा होत असल्याचे त्यांनी सांगितले. डीजेऐवजी ढोल-ताशांसारखी पारंपरिक वाद्ये आपल्याला अधिक आवडतात, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी भाविक आणि तरुणांनी त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी मोठी गर्दी केली.
शेतकरी आणि दुष्काळाच्या प्रश्नांवर बोलताना अमित ठाकरे यांनी केवळ देवाकडे प्रार्थना करण्यापेक्षा प्रत्यक्ष मैदानात उतरून लोकांचे प्रश्न सोडवणे अधिक महत्त्वाचे असल्याचे म्हटले. दरम्यान, राज ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री व्हावे, अशी प्रार्थना आपण गणरायाकडे केल्याचे त्यांनी सांगितले. भाविकांकडून मिळणारे प्रेम ही आपल्यासाठी मोठी गोष्ट असून त्यासाठी आपण स्वतःला नशीबवान समजतो, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.