राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. (Rain) या पावसाचा सर्वात मोठा फटका मराठवाड्याला बसला आहे. अनेकांचं कधीच भरून न येणार नुकसान झालं आहे. जमीन खरडून गेली आहे. पिकं सडली आहेत. अजूनही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचलेले आहे. दरम्यान अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांना राज्य सरकारचा मोठा दिलासा दिला आहे.
अतिवृष्टीमधील जिल्ह्यांना जिल्हा वार्षिक योजनेतील निधीतून मदत मिळणार आहे. नैसर्गिक आपत्तीत नागरिकांना तात्काळ मदत करण्यासाठी शासन निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना मदतीसाठी सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा करावी लागणार नाही. मराठवाडा, परभणी, अमरावती, अकोला, धाराशिव, सोलापूर जिल्ह्यांना मदत होणार आहे. या जिल्ह्यात आता प्रशासनाला मदतीसाठी निधी उपलब्ध होणार आहे.
एकूण जिल्हा वार्षिक निधीच्या ५ टक्क्यांपर्यंत खर्च करण्याची मुभा देण्यात आली आहे. यापूर्वी केवळ टंचाईसाठी निधी वापरण्याची मुभा होती. आता पूर,अतिवृष्टी, गारपीट यासाठी देखील जिल्हा वार्षिक योजनेतील निधी वापरता येईल. त्यामुळे ग्रामीण भागातील नुकसानीसाठी भरपाईची तरतूद करता येईल.
आरोग्य विभागाकडून साथीचे रोग येऊ नये यासाठी उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करत आहे. ब्लिचिंग पावडर, इतर गोष्टींच्या उपाययोजना होत आहेत. ग्रामपंचायतींबरोबर देखील आम्ही संपर्क ठेऊन आहोत, अशी माहिती आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर यांनी दिली आहे. महापुराचे प्रमाण बघितल्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी आम्हाला सांगितलं होतं की बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करा.