धाराशिव : धाराशिवमधील परंडा तालुका म्हणजे कमी पावसाचा भाग. अशातच अर्थिक परिस्थिती जेमतेम तरीही संघर्षमय परिस्थितीतून पुढे येत शेतकऱ्याचा मुलगा उपजिल्हाधिकारी पदी विराजमान झाला आहे. शेतकऱ्याच्या मुलाला मिळालेल्या यशाबद्दल राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी पत्राद्वारे कौतुक केलंय.
सावंत पत्रात म्हंटले, धाराशिवमधील परंडा तालुक्यातील लाकीबुकी येथील भास्करराव गायकवाड हे गेल्या अनेक वर्षांपासून सालगडी म्हणून कार्यरत आहेत. मात्र, आपल्या प्रमाणेच हालाखीचे जीवन मुलाच्या वाट्याला येऊ नये, यासाठी त्यांनी आपल्या मुलाला चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी सातत्याने कष्ट आणि मेहनत घेतली.
समाधान गायकवाड असं या सालगड्याच्या मुलाचं नाव असून समाधानने वडिलांच्या कष्टाचं सार्थक करत त्यांचे उपजिल्हाधिकारी पद मिळवले. समाधान गावात ग्रॅज्युएट, अभियंता होणारे पहिले युवक असून आता गावातील पहिले सरकारी अधिकारी देखील तेच ठरले आहेत.
धाराशिव जिल्हा हा नेहमीच कमी पाऊसाचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. त्यामुळे १२ एकर शेती असूनही घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. गायकवाड कुटुंबातील दोघेही पती-पत्नी समाधान यांच्या शिक्षणासाठी कायम आग्रही राहिले.
त्यासाठी दोघांनीही शेतात अविरत कष्ट घेतले. घराची परिस्थिती नाजूक तर होतीच, मात्र, शिक्षणातली पुढची अडचण म्हणजे गावात शाळा देखील फक्त ३ री पर्यंतच होती. इयत्ता ३ री नंतर समाधान यांना दुसऱ्या गावी शिक्षण घ्यावे लागले. शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन, आई-वडिलांचे संस्कार आणि शिक्षणासाठी सातत्याने मिळणारा पाठिंबा यामुळे समाधान यांनी देखील मन लावून अभ्यास केला.
दहावीपर्यंत घरात लाईट नव्हती. त्यावेळी अक्षरशः दिव्याच्या प्रकाशात त्यांनी अभ्यास केला आणि दहावीत ८७% मिळवले,
अशाच संघर्षमय परिस्थितीतून अभियांत्रिकीचे शिक्षण झाल्यानंतर २०१६ मध्ये युपीएससी परीक्षा दिली. मात्र, पूर्व परीक्षेत अगदी थोड्याशा मार्कांसाठी त्यांना कट ऑफ गमवावा लागला. परंतु हार न मानता त्यांनी चिकाटीने प्रयत्न सुरू ठेवला. २०१८ मध्ये ते तहसीलदार झाले होते. मात्र, उपजिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते.
तहसीलदार झाल्यानंतरही २०१९ मध्ये सातत्याने अभ्यास करून त्यांनी राज्यसेवा परीक्षा दिली आणि अखेर उपजिल्हाधिकारी हे स्वप्न पूर्ण केले. कोणत्याही बिकट परिस्थितीत हार न मानता सातत्याने प्रयत्न करीत राहिल्यास यश निश्चितच मिळते.
दरम्यान, समाधान गायकवाड यांचं यश युवा पिढीसाठी हे एक उत्तम उदाहरण असून धाराशिवच्या भूमीतून असे गुणवंत विद्यार्थी घडत आहेत, याचे फार समाधान वाटत असल्याचंही सावंत यांनी म्हंटले आहे.