सोशल मीडियावरील ‘क्लीन इमेज’ ठरली तस्करीचं कवच; गांजाच्या तस्करीप्रकरणी सर्पमित्र आकाश जाधवला अटक

सापांना जीवनदान देण्याच्या नावाखाली गांजाची कोट्यवधींची तस्करी करणाऱ्या आकाश जाधव याला छत्तीसगडमधील महासमुंद पोलिसांनी अटक केली.

  • Written By: Published:
Untitled Design (357)

Snake friend Akash Jadhav arrested for smuggling ganja : सोशल मीडियावर सर्पमित्र आणि समाजसेवक म्हणून मिरवणाऱ्या एका नामवंत युट्यूबरचा खरा चेहरा आता समोर आला आहे. सापांना जीवनदान देण्याच्या नावाखाली गांजाची कोट्यवधींची तस्करी करणाऱ्या आकाश जाधव याला छत्तीसगडमधील महासमुंद पोलिसांनी अटक केली आहे. आकाश जाधवचे युट्यूबवर तब्बल 56 लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स असून, त्याच्या अटकेमुळे सोशल मीडिया विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.

7 जानेवारी रोजी महासमुंद जिल्ह्यातील कोमाखान पोलिसांनी संशयाच्या आधारे एका रुग्णवाहिकेची तपासणी केली. तपासणीदरम्यान पोलिसांना मोठा धक्का बसला.रुग्णवाहिकेतून 5 क्विंटल 20 किलो गांजा जप्त करण्यात आला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या गांजाची किंमत सुमारे 2 कोटी 60 लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रथम या प्रकरणात 3 तस्करांना अटक करण्यात आली. मात्र, चौकशीतून या संपूर्ण तस्करी रॅकेटचा मास्टरमाइंड आकाश जाधव असल्याचे उघड झाले.

आकाश जाधव हा महाराष्ट्रातील अहिल्यानगर येथील रहिवासी आहे. सोशल मीडियावर तो स्वतःला पर्यावरणप्रेमी, सर्पमित्र आणि स्नेक रेस्क्यूअर म्हणून सादर करत होता. सापांचे रेस्क्यू करतानाचे त्याचे व्हिडीओ लाखो लोक पाहत होते आणि त्याच लोकप्रियतेचा गैरवापर करून तो गांजाच्या तस्करीचा व्यवसाय करत होता. पोलिसांच्या माहितीनुसार, आकाश जाधवने गेल्या एक वर्षात 6 ते 7 वेळा ओडिशावरून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गांजाची ने-आण केली होती.

अर्थसंकल्पात मोठी घोषणा; देशात उभारले जाणार 7 नवे हाय-स्पीड रेल कॉरिडोर

या संपूर्ण प्रकरणाचा तपास अँटी नारकोटिक्स टास्क फोर्स आणि कोमाखान पोलिसांनी संयुक्तपणे केला. या कारवाईत आतापर्यंत एकूण 9 आरोपींना अटक करण्यात आली असून, यामध्ये गांजाची घाऊक विक्री, वाहतूक आणि किरकोळ पुरवठा करणाऱ्यांचा समावेश आहे. पोलिसांची नजर चुकवण्यासाठी आणि चेकपोस्टवर संशय टाळण्यासाठी रुग्णवाहिकेचा वापर करण्यात येत होता.

आकाश जाधवचे इंस्टाग्रामवरही 3 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावरील त्याची स्वच्छ प्रतिमा हीच त्याच्या तस्करीच्या व्यवसायासाठी सुरक्षित कवच ठरत होती. तो पुण्यात गांजाची मोठी खेप पोहोचवण्याच्या तयारीत असतानाच छत्तीसगड पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. या घटनेनंतर सोशल मीडियावरील काही इन्फ्लुएन्सर्सच्या जीवनशैली, उत्पन्नाचे स्रोत आणि वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. लोकप्रियतेआड लपलेला गुन्हेगारी चेहरा समाजासमोर येत असल्याचे हे प्रकरण मानले जात आहे.

follow us