गणराया पाऊस घेऊन आला; राज्यात बाप्पाच्या आगमनासोबत वरुणराजाची हजेरी, शेतकऱ्यांना मोठा दिलासा

Maharashtra Rain Update : भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबई आणि पुण्यात आजही ढगांची दाटी कायम आहे.

News Photo   2026 09 14T095306.343

Maharashtra Rain Update

Maharashtra Rain Update : गणरायाच्या आगमनासोबतच राज्यात (Rain) वरुणराजानेही हजेरी लावली आहे. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी मुंबईसह अनेक भागात पावसाने जोर धरला. त्यामुळे बाप्पाच्या स्वागताची तयारी करणाऱ्या नागरिकांची काहीशी गैरसोय झाली असली तरी पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गणेशोत्सवाच्या सुरुवातीलाच पाऊस परतल्याने राज्यातील वातावरणात उत्साहासोबतच समाधानाचंही वातावरण निर्माण झालं आहे.

आज 14 सप्टेंबरला गणेश चतुर्थी असून बाप्पाच्या आगमनाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबई आणि पुण्यात आजही ढगांची दाटी राहून हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. मुंबई शहर आणि उपनगरात अधूनमधून सरी कोसळतील, तर पुण्यातही काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे गणरायाच्या आगमनासोबत पावसाचीही साथ मिळण्याची चिन्हं आहेत.

आज लाडक्या गणरायाचं आगमन, राज्यभरात भक्तांची लगबग; जाणून घ्या गणेशोत्सवाचे सर्व अपडेट्स

विदर्भातही पावसाची हजेरी कायम राहण्याचा अंदाज आहे. नागपूरमध्ये दुपारनंतर आणि संध्याकाळच्या सुमारास विजांच्या गडगडाटासह पाऊस होऊ शकतो. नाशिकमध्ये मध्यम स्वरूपाचा, तर सातारा आणि अकोला जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक भागातील पिकांना या पावसाचा फायदा होण्याची अपेक्षा आहे.

गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत होते. अशा परिस्थितीत गणेशोत्सवाच्या तोंडावर पावसाने पुन्हा सुरुवात केल्याने बळीराजाच्या आशा उंचावल्या आहेत. शहरांमध्ये गणेश भक्तांच्या उत्साहात पावसाची हलकी सर मिसळणार असली तरी शेतकऱ्यांसाठी हा पाऊस वरदान ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा ‘गणराया आला आणि सोबत पाऊसही घेऊन आला’ असंच चित्र राज्यात पाहायला मिळत आहे.

Exit mobile version