Ashish Shelar : मुंबईतील नालेसफाईच्या कामाची पाहणी केल्यानंतर आज मुंबई उपनगर पालकमंत्री आशिष शेलार यांनी कामाबद्दल असमाधान व्यक्त करीत गेल्या सव्वा महिन्यात काही ठिकाणी 10 टक्के तर काही ठिकाणी 20 ते 30 पेक्षा जास्त काम झालेले दिसत नाही, एकूण कामे ही बेभरवशाची आहेत, असे निरिक्षण माध्यमांशी बोलताना नोंदवले. आज आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मुंबई पश्चिम उपनगरातील नालेसफाईचा पाहणी दौरा केला.
सांताक्रूझ पश्चिम येथील गझदरबांध येथून या दौऱ्याला सुरुवात करण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक प्रभाकर शिंदे, भालचंद्र शिरसाट, विनोद मिश्र, अलका केरकर, स्वप्ना.म्हात्रे, हेतल गाला यांच्यासह भाजपाचे स्थानिक पदाधिकारी व संबंधित अधिकारी उपस्थित होते. गझदरबांध नंतर एस.एन.डि.टी नाला, ईरला नाला, मोगरा, शहिद भगतसिंग नगर नाल्यावर जाऊन त्यांनी पाहणी केली. त्या त्या विभागातील स्थानिक पदाधिकारी आणि माजी नगरसेवक या दौऱ्यात सहभागी झाले होते.
नालेसफाईचं व्हिडिओ शूटिंग आणि फोटोग्राफी होते असे अधिकाऱ्याने सांगितल्यावर मिलेनियम नाला येथे संबंधित अधिकारी वर्ग नाल्यातील गाळ काढल्यावर भरतानाचा आणि नंतर भरलेल्या डंपरचा तसेच रिकाम्या होणाऱ्या डंपरचा व्हिडिओ दाखवू शकले नाहीत. त्यामुळे नालेसफाईची व्हिडिओ ग्राफी हे प्रत्यक्षात किती होते याची माहिती व्हिडिओ वरून मिळाली नाही आणि तंत्रज्ञानाचा नक्की कसा आणि कुठे उपयोग केला जातो याची माहिती पर्जन्य जलवाहिनी खात्याचे अधिकारी देऊ शकले नाहीत. ज्या अँपवर माहिती देणार असे सांगितले जाते तेही अधिकाऱ्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला पण तेही अपडेट नसल्याचे दिसून आले. त्यामुळे एकूणच बेभरवशाची कामे सुरु असल्याचे चित्र पहायला मिळाली.
दरम्यान याबाबत माध्यमांशी बोलताना आशिष शेलार म्हणाले की, गझदरबांध येथील नाल्यांची कामे गेल्या 35 दिवसांत 10 टक्क्यांपेक्षा जास्त कामे झालेली नाहीत, अशी माहिती समोर आली आणि हे अत्यंत धक्कादायक आहे. उर्वरीत महिन्यात हे काम कसे पूर्ण होणार याबाबत आम्ही प्रशासनाला पाठपुरावा करु. तर काही ठिकाणी 20 ते 30 टक्के काही ठिकाणी 50 टक्के सांगितली जात आहेत पण सगळे बेभरवशाची कामे सुरु आहेत. पण केवळ टीका टिप्पणी करुन चालणार नाही. आम्ही आयुक्तांना सांगू की, तुम्ही स्वतः रस्त्यावर या, आणि कामाची पाहणी करा. मुंबईकरांना गैरसोय होऊ नये म्हणून ही कामे वेळेत पूर्ण व्हावीत त्यासाठी आवश्यक ती, यंत्रणा लावा. कंत्राटदारांकडून नालेसफाईची कामे वेळेत करुन घेणे आवश्यक आहे.
ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच! पाकिस्तानमधील 12 नवीन ठिकाणांची यादी तयार…
कंत्राटदारांना पाठीशी घालू नका. काही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत ते अनुत्तरीत आहेत. गाळ काढताना नाल्यांची लांबी, रुंदी, उंची, खोली कशी मोजली जाते? ती कुठून कशी मोजली जाते? त्याचे प्रमाण काय? आधुनिक तंत्रज्ञान आणि AI च्या मदतीने गाळाचे मोजमाप केले जाते. मग त्यासाठी कोणत्या मशीन्स वापरतात? त्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरले जाते? हे काहीच दाखवायला कंत्राटदार तयार नाहीत. ही बाब मुंबई आयुक्तांच्या लक्षात आणून देऊ, असेही मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले.