भोंदूगिरीच्या आड काळा खेळ? अशोक खरातवर जमीन हडपल्याचा आणि हत्येचा गंभीर आरोप

शेतकरी विलास जाधव यांनी खरात याच्यावर जमीन बळकावण्याबरोबरच त्यांच्या भावाची सुपारी देऊन हत्या केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

Untitled Design 83

Untitled Design 83

Ashok Kharat faces serious charges of land grabbing and murder : नाशिक जिल्ह्यातील स्वयंघोषित ज्योतिषी आणि भोंदू म्हणून चर्चेत असलेल्या अशोक खरात यांच्या अडचणींमध्ये आणखी भर पडली आहे. गौळाणे येथील शेतकरी विलास जाधव यांनी खरात याच्यावर जमीन बळकावण्याबरोबरच त्यांच्या भावाची सुपारी देऊन हत्या केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या आरोपांमुळे आधीच विविध गुन्ह्यांमध्ये अडकलेल्या खरतविरोधातील वाद अधिकच तीव्र झाला आहे.

विलास जाधव यांनी सांगितले की, त्यांच्या कुटुंबाची गौळाणे परिसरात शेती जमीन आहे. या जमिनीवरून काही वर्षांपासून अशोक खरात याच्यासोबत वाद सुरू होता. जाधव यांच्या म्हणण्यानुसार, खरातने दबाव, धमक्या आणि फसवणूक करून ही जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. जाधव यांच्या भावाने 2022 मध्ये या प्रकरणी अशोक खरात याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. जमीन वादाचा निकाल न्यायालयात लागणार होता. मात्र, न्यायालयाचा निर्णय लागण्याच्या अवघ्या दोन दिवस आधीच जाधव यांच्या भावाचा संशयास्पद अपघाती मृत्यू झाला.

हा अपघात नसून नियोजनपूर्वक केलेली सुपारी हत्या असल्याचा ठाम आरोप विलास जाधव यांनी केला आहे. जाधव यांच्या मते, या घटनेनंतर त्यांनी पुन्हा पोलिसांकडे धाव घेतली. मात्र तक्रार करूनही पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा आणि भावाच्या मृत्यूमागील सत्य बाहेर यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

युद्धाचा परिणाम दीर्घकाळ टिकू शकतो, कोरोना संकटाप्रमाणे तयार राहावे लागेल : मोदी

दरम्यान, अशोक खरात याच्याविरोधात यापूर्वीही अनेक गंभीर आरोप समोर आले आहेत. काही महिलांनी त्याच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत, तर फसवणूक, धमकावणे आणि भोंदूगिरीच्या नावाखाली पैसे उकळल्याच्या तक्रारी देखील दाखल झाल्या आहेत. या सर्व प्रकरणांचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक नियुक्त करण्यात आले असून तपास सुरू आहे.

तपासादरम्यान एक धक्कादायक बाब समोर आली आहे. अशोक खरात आणि त्याच्या कुटुंबियांच्या नावावर 50 हुन अधिक मालमत्ता असल्याची माहिती सातबारा उताऱ्यांमधून समोर आली आहे. नाशिक शहरासह गौळाणे, सिन्नर, शिर्डी या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात शेती जमीन आणि भूखंड त्याच्या नावावर असल्याचे समोर आले आहे. या सर्व मालमत्तेची किंमत शेकडो कोटी रुपयांपर्यंत असू शकते, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

स्थानिक शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, भोंदूगिरीच्या नावाखाली अशोक खरात अनेकांना जाळ्यात ओढत असे. ज्योतिष, पूजा, दोषनिवारण यांसारख्या गोष्टींचे आमिष दाखवत काही शेतकऱ्यांकडून जमीन आणि पैसे उकळल्याच्या तक्रारी यापूर्वी देखील समोर आल्या आहेत. काही प्रकरणांमध्ये दमदाटी आणि डब्बावा टाकून जमिनींचे व्यवहार केल्याचा देखील आरोप आहे.

गौळाणे परिसरात अशोक खरातच्या नावावर मोठ्या प्रमाणात जमीन असल्याचे सातबारा नोंदींमधून स्पष्ट होत असल्याने या मालमत्तेचा स्रोत आणि व्यवहारांची तपासणी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. विलास जाधव यांनी केलेल्या आरोपांमुळे या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळाले आहे. त्यांच्या भावाच्या मृत्यूची चौकशी पुन्हा सुरू होण्याची शक्यता असून, तपासाचा फोकस आता संभाव्य हत्येच्या दिशेने देखील वळू शकतो दरम्यान, वाढत्या तक्रारी आणि नव्या आरोपांमुळे येत्या काळात या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version