Tushar Doshi : मंत्र्यावर हात अन् वर्दीवर डाग; अंतरवाली ते सातारा… तुषार दोषींच्या वादाची ‘कुंडली’!

Tushar Doshi जालन्यातील अंतरवाली सराटीत मराठा आंदोलकांवर झालेला अमानुष लाठीमार आजही महाराष्ट्राच्या काळजात सलतोय.

  • Written By: Published:
अंतरवाली ते सातारा... वाद जणू सावली! SP तुषार दोषींच्या निलंबनाची इनसाईड स्टोरी

IPS Tushar Doshi & Controversy :  महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आजवर जे घडलं नाही, ते साताऱ्यात घडलं. एका जिल्ह्याचा पालकमंत्री, जो कॅबिनेट मंत्री आहे, त्याला चक्क पोलिसांनी घेरलं… धक्काबुक्की केली… आणि कंबरेला धरून ओढलं, ही तक्रार खुद्द मंत्री शंभुराज देसाई यांनी विधान परिषदेत मांडली. पण या संपूर्ण राड्याच्या केंद्रस्थानी एकच नाव आहे आणि ते म्हणजे साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी. ज्या तुषार दोषींवर अंतरवाली सराटीच्या लाठीमारामुळे ठपका ठेवला होता, आता त्यांच्यावरच निलंबनाची टांगती तलवार आली आहे. नेमकी दोषी यांची आतापर्यंतची कारकीर्द कशी राहिली आहे त्याचा मागोवा घेणारा हा विशेष रिपोर्ट…

सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीचा दिवस रणसंग्राम ठरला. मतदान सुरू असताना पालकमंत्री शंभुराज देसाई, मंत्री मकरंद पाटील आणि नितीन पाटील यांना पोलिसांनी रोखलं. परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की मंत्र्यांना जखम झाली. या संपूर्ण घटनेबाबत शंभुराज देसाई यांनी सभागृहात सांगितलं की, १०-१० पोलिसांनी मला पकडलं होतं, कोणी हाताला तर कोणी कंबरेला धरून ओढत होतं. मंत्र्याला अशी वागणूक? असा संतप्त सवाल उपस्थित केला.

या प्रकरणाचे पडसाद अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटले आणि विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी कडक शब्दांत फटकारत थेट SP तुषार दोषींना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले. त्यामुळे मंत्र्याला झालेल्या मारहाणीचा हिशोब आता थेट खाकी वर्दीला द्यावा लागणार आहे. पण, तुषार दोषी वादात अडकण्याची ही पहिलीच वेळ नाही. जालन्यातील अंतरवाली सराटीत मराठा आंदोलकांवर झालेला अमानुष लाठीमार आजही महाराष्ट्राच्या काळजात सलतोय. त्या घटनेवेळी तुषार दोषी जालन्याचे एसपी होते. लाठीचार्जनंतर उसळलेल्या जनतेच्या रोषानंतर प्रशासनाने दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं.

त्यानंतर दोषी यांचा बदल्यांचा खेळ सुरू झाला. सक्तीच्या रजेवर पाठवल्यानंतर दोषी यांची जालन्यातून राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) अधीक्षकपदी सोमवारी बदली करण्यात आली. पण, तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे बदलीला स्थगिती देण्याची मागणी केली. त्यानंतर दोशी यांची पुणे लोहमार्ग अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली होती.

कोण आहेत तुषार दोषी?

तुषार दोशी हे २००१ मध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर पोलीस दलात भरती झाले. पदवी घेतल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा दिली आणि पोलीस खात्यात भरती झाले, दोषी यांनी फिजिक्समध्ये पदवी घेतली असून पदवीनंतर त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. तुषार दोशी यांचे वडील हे रायगड जिल्हा परिषदेत नोकरी करायचे.

वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत तुषार दोशींनी सरकारी नोकरीच करायची असा निश्चय केला. इयत्ता ४ थीपर्यंत तुषार दोशींनी रायगडमध्ये शिक्षण घेतले. यानंतर स्कॉलरशिप मिळवत ते धुळ्यातील सरकारी विद्यानिकेतनमध्ये गेले. ११ वीनंतरचे शिक्षण त्यांनी पुण्यात घेतले.

नाशिकमध्ये ट्रेनिंग, चंद्रपूरमध्ये पहिली पोस्टींग

२००१ मध्ये नाशिकमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर तुषार दोशींची पहिली पोस्टींग चंद्रपूरमध्ये करण्यात आली. राजुरा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. चंद्रपूरमधील राजुरा नक्षलींचा प्रभाव असलेला भाग होता. गडचिरोलीतील नक्षलवादी या भागात आश्रय घ्यायचे असे तुषार दोशींनी एका मुलाखतीत सांगितले होते. यानंतर लातूर शहर, सोलापूर, पुणे, नवी मुंबई या शहरांमध्ये त्यांनी काम केले.

तुषार दोशींनी हाताळलेली बहुचर्चित प्रकरणे

तुषार दोशी हे पुणे पोलीस दलात सायबर विभागात उपायुक्त होते. २०१८ च्या सुमारास नवी मुंबईतील पोलीस उपायुक्तपदी कार्यरत असताना तुषार दोशी एजाज खान अटक प्रकरण, अश्विनी बिद्रे- गोरे हत्याप्रकरणामुळे चर्चेत होते. अभिनेता एजाज खानला ऑक्टोबर २०१८ मध्ये अटक करण्यात आली होती. दोशी यांच्या पथकाने ही कारवाई केली होती. (संदर्भ- Hindustan Times) या प्रकरणाचा तपास काही दिवसांनी एनसीबीकडे सोपवण्यात आला होता. तर, अश्विनी बिद्रे प्रकरणात तुषार दोशी यांनी आरोपीच्या वकिलांना गोपनीय माहिती पुरवली होती, असा आरोप अश्विनी यांच्या वडिलांनी पत्राद्वारे केला होता. (संदर्भ- टाईम्स ऑफ इंडिया) २०१६ मधील फर्ग्युसन महाविद्यालयातील देशविरोधी घोषणांसंदर्भातील प्रकरणाचा तपासही त्यांनी केला होता.

चंद्रपूरच्या जंगलातून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज विधान परिषदेतील निलंबनाच्या आदेशापर्यंत येऊन ठेपलाय. मग ते अश्विनी बिद्रे प्रकरण असो, अंतरवाली सराटीचा लाठीमार असो वा साताऱ्यातील मंत्र्यांसोबत झालेली धक्काबुक्की… वाद जणू दोषींच्या सावलीसारखा सोबत चालतोय. निलम गोऱ्हे यांच्या निलंबनाच्या आदेशानंतर आता सरकार काय भूमिका घेतं आणि तुषार दोषींच्या कारकिर्दीला कोणता वळण मिळतं, हे पाहणं महत्वाचं ठरेल.

follow us