नीलम गोऱ्हेंची संपत्ती 6 वर्षांत दहापट, सिद्दीकींची 2 वर्षांत चौपट; दानवेंची कौटुंबिक मालमत्ता 9 कोटींवर
विद्यमान उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या संपत्तीत गेल्या सहा वर्षात तब्बल दहा पट वाढ झाल्याचे त्यांच्या प्रतिज्ञापत्रातून दिसून येते.
Vidhan Parishad Election Candidate Property : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांमधून त्यांच्या संपत्तीबाबत अनेक महत्वाचे तपशील समोर येत आहेत. यामध्ये काही नेत्यांच्या संपत्तीत अल्पावधीतच मोठी वाढ झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. विशेषतः नीलम गोऱ्हे, अंबादास दानवे आणि झिशान सिद्दीकी यांच्या संपत्तीत झालेली वाढ चर्चेचा विषय ठरत आहे.
विधान परिषदेच्या विद्यमान उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या संपत्तीत गेल्या सहा वर्षात तब्बल दहा पट वाढ झाल्याचे त्यांच्या प्रतिज्ञापत्रातून दिसून येते. 2020 साली त्यांच्याकडे 1.57 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता होती, तर स्थावर मालमत्ता सुमारे सहा कोटी रुपयांच्या घरात होती. मात्र आता त्यांच्या जंगम मालमत्तेची किंमत वाढून 11.66 रुपयांवर पोहोचली आहे. याशिवाय त्यांनी 7.69 कोटी रुपयांची स्वअर्जित आणि 12.76 कोटी रुपयांची वडिलोपार्जित स्थावर मालमत्ता जाहीर केली आहे. त्यांच्या नावावर सुमारे 34.69 लाख रुपयांची टोयोटा इनोव्हा हायक्रॉस ही आलिशान गाडी देखील आहे.
14 लाख विद्यार्थ्यांसाठी मोठा दिवस, दुपारी 1 वाजता जाहीर होणार बारावीचा निकाल
दुसरीकडे, शिवसेना (उबाठा) पक्षाचे उमेदवार अंबादास दानवे यांच्या संपत्तीत देखील लक्षणीय वाढ झाली आहे. 2019 मध्ये त्यांच्या कुटुंबाची एकूण जंगम संपत्ती 63.78 लाख रुपये एवढी होती, तर स्थावर मालमत्ता 46.24 लाख रुपयांची होती. मात्र नव्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्या कुटुंबाची जंगम संपत्ती वाढून 2.36 कोटी रुपयांवर गेली आहे, तर स्थावर मालमत्ता सुमारे 5.6 कोटी रुपये एवढी झाली आहे. त्यांच्या कुटुंबावर एकूण 8.96 कोटी रुपयांचे कर्ज असल्याची नोंद आहे. त्यांच्या पत्नीच्या नावावर मर्सिडीज बेंझ ही आलिशान कार देखील आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार झिशान सिद्दीकी यांच्या संपत्तीत अवघ्या दोन वर्षांत मोठी झेप घेतल्याचे दिसून आले आहे. 2024 मध्ये त्यांनी 5.20 कोटी रुपयांची जंगम आणि 31.69 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता जाहीर केली होती. त्यावेळी त्यांच्या नावावर 8.77 कोटी रुपयांचे कर्ज देखील होते. मात्र सध्याच्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्या जंगम मालमत्तेत मोठी वाढ होऊन ती 21.17 कोटी रुप्यानावर पोहोचली आहे. स्थावर मालमत्तेत काहीशी घट होऊन ती 28.74 कोटी रुपये इतकी राहिली आहे. तसेच त्यांच्या कर्जात देखील थोडी घट होऊन ते आता 8.69 कोटी रुपये असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
एकूणच, निवडणुकीच्या तोंडावर समोर आलेल्या या आकडेवारीनुसार विविध राजकीय नेत्यांच्या आर्थिक वाढीबाबत चर्चा रंगू लागली आहे.