BJ Kolse Patil : आज पुण्यात एका कार्यक्रमामध्ये बोलताना माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील (BJ Kolse Patil) यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्यासमोरचं पंतप्रधान पदाबाबत मोठं वक्तव्य केलं. असला खोटारडा पंतप्रधान आमच्यावर बसवण्यापेक्षा तुम्हीच का होत नाही पंतप्रधान ? असं विधान कोळसे पाटील यांनी केलं.
पुण्यात आज मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांचा अभिष्टचिंतन सोहळा पार पडला. निवृत्त न्यायमुर्ती बी जे कोळसे पाटील, साहित्यिक इंद्रजित भालेराव यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाला कोळसे पाटील संबोधित करत असतांना गडकरी मंचावर आले आणि त्यांना उद्देशून कोळसे पाटील म्हणाले की, असला खोटारडा पंतप्रधान आमच्यावर बसवण्यापेक्षा तुम्हीच ती गादी का घेत नाहीत? असा सवाल कोळसे पाटील यांनी केला. यानंतर उपस्थित लोकांनी टाळ्या वाजवून शिट्ट्या वाजवून आपला उत्साह दाखवला. पुढं बोलताना कोळसे-पाटील यांनी गडकरींना या वक्तव्याचे कारणही सांगितलं.
ते म्हणाले की, तुम्ही तुमच्या बोलण्यातून सर्वसमावेशक दिसता आणि तु्म्ही जर इतिहास पाहिला तर एकही ब्राह्मण नेता सर्वसमावेशक नेता झालेला नाही. तुम्हाला संधी आहे. तुम्ही पंतप्रधान होऊ शकता, तुम्हाला मी सुयश चिंतीतो. आमची तुम्हाला विनंती आहे. तुम्ही आम्ही वैचारिकदृष्ट्या विरोधक असलो तरी आमचा नाईलाज आहे. तुम्ही त्यातल्या त्यात आम्हाला न्याय द्यालं, असं आम्हाला वाटतं, असं कोळसे पाटील म्हणाले.
कोळसे पाटील यांनी मराठा आरक्षणावरही यावेळी भाष्य केले. मराठ्यांना आरक्षण हे केंद्राकडून दिलं गेलं पाहिजे. आज महाराष्ट्रात 48 खासदार आहेत, जवळपास सर्वच बहुजन समाजातील आहेत, त्या सर्वांनी पंतप्रधान मोदींना जर सांगितले की, तुम्ही मराठ्यांना आरक्षण द्या, नाहीतर आम्ही सर्वजण तुमचा पाठिंबा काढून घेऊ, तर मग एका मिनिटात आरक्षण देतील, असं कोळसे पाटील म्हणाले.
राजकारणात फक्त ‘युज अँड थ्रो’ – गडकरी
गडकरी म्हणाले, आपला देश अनेक समाजांनी मिळून तयार झालाय आणि त्यातील शेवटचा घटक आहे तो परिवार. आणि त्या परिवारातील महत्वाचा घटक आहे व्यक्ती. त्यामुळे समाज आणि देशाचा विकास करायचा असेल तर आधी कुटुंबांचा विकास करावा लागेल. एकदा एक गृहस्थ माझ्याकडे आले आणि मला देशसेवा करायची असं सांगू लागले. त्यांच किराणा दुकान होतं, व्यवसायात दिवाळं निघालेलं. घरी बायको आणि मुले होती. मी त्यांना म्हणालो, देशाला आणि राजकारणालाही तुमची गरज नाही. पहिले घर सांभाळलं पाहिजे आणि मग देश सेवेचा विचार करा. कारण राजकारणाबद्दल माझं मत काही चांगलं नाही, इथे फक्त युज अॅंड थ्रो केला जातो, असं गडकरी म्हणाले.