बीड : बीड लोकसभा मतदारसंघातील बडे नेते म्हणून ओळखल्या जाणारे बजरंग सोनावणे (Bajranag Sonawane) आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यांनी आज (20 मार्च) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना पत्र लिहून पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. दरम्यान, सोनावणे यांना बीडमधून भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्याविरोधात सोनावणे यांना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
बीड मतदारसंघ हा मुंडे कुटुंबियांचा बालेकिल्ला समजला जातो. 2009, 2014 या दोन्ही लोकसभा निवडणुकीमध्ये गोपीनाथ मुंडे यांनी विजय मिळविला होता. त्यानंतर 2014 च्या पोटनिवडणुकीत तब्बल सात लाखांच्या मताधिक्याने प्रीतम मुंडे विजयी झाल्या होत्या. त्यानंतर 2019 मध्ये पुन्हा प्रीतम मुंडे यांनी संसद गाठली. मात्र त्यावेळी बजरंग सोनावणे यांनी त्यांना मोठे आव्हान दिले होते. त्यांच्याविरोधात सोनावणे यांनी तब्बल सव्वा पाच लाख मते घेतली होती.
आता भाजपकडून पंकजाताई मुंडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून कोणाला उमेदवारी जाहीर होणार याविषयी जिल्ह्यात उत्सुकता आहे. सुरुवातीला डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे यांच्या नावाची चर्चा होती. ते गावोगाव प्रचारही करीत होते. परंतु पंकजाताई मुंडे यांची उमेदवारी जाहीर होताच त्यांचे नाव मागे पडले. त्यानंतर बजरंग सोनवणे यांच्या नावाची चर्चा सुरु झाली. आता ते अजित पवार यांची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात अधिकृत प्रवेश करणार असल्याने त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
बजरंग सोनावणे हे मागील अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय आहेत. दांडगा जनसंपर्क असणारा नेता म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांच्याकडे बीड राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षपद देखील होते. जिल्हा परिषदेतील सत्तापरिवर्तन, जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत चार मतदार संघात राष्ट्रवादीच्या घड्याळाचा गजर करण्यात सोनावणे यांनी मोठी भूमिका बजावली होती. ते बीड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष असून त्यांच्या पत्नी देखील माजी जिल्हा परिषद सदस्या आहेत. याशिवाय येडेश्वरी शुगर या खासगी साखर कारखान्याचे ते चेअरमन व कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत आहेत.