मुंबई : आज देशभरातील बँक ऑफ महाराष्ट्राचे कर्मचारी संपावर जाणार आहेत. नोकर भरतीच्या प्रश्नावर संपूर्ण देशातल्या बँक ऑफ महाराष्ट्रमधील कर्मचारी आज एक दिवसीय संपावर जाणार आहेत. दरम्यान देशातील सर्व बँकांनी महिन्याच्या शेवटी म्हणजेच 30 आणि 31 जानेवारी रोजी संपाचा इशारा दिला आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागणार आहे.
राज्यात बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या एकूण 700 शाखा असून कर्मचाऱ्यांची संख्या 13 हजार इतकी आहे. दरम्यान 30 आणि 31 जानेवारी रोजी देशातील सर्व बँकांच्या कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. कर्मचाऱ्यांकडून पुकारण्यात आलेल्या या आजच्या संपाचा फटका ग्राहकांना सहन करावा लागणार आहे.
दरम्यान तत्पूर्वी युनायटेड फोरम ऑफ महा बॅंक युनियनकडून एक परिपत्रक काढत देशव्यापी संपाचा इशारा दिला आहे. देशातील सर्व बॅंकांकडून 30 आणि 31 जानेवारी रोजी संपाचा इशारा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे बॅंक ऑफ महाराष्ट्र 27 जानेवारी ते 31 जानेवारीपर्यंत बंद राहण्याची शक्यता आहे. म्हणजेच तब्बल 5 दिवस बँक बंद राहण्याची शक्यता आहे.
नेमकी कारणे आहेत तरी काय ? जाणून घ्या
बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये सध्या काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. परिणामी कामाचा ताणा इतर कर्मचाऱ्यांवर अधिक प्रमाणात येत आहे. त्यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी बँकेतील कर्मचाऱ्यांची संख्या वाढवत नसल्याचा आरोप बॅंक संघटनेकडून करण्यात येत आहे.
बॅंकेचा कारभार मोठ्या प्रमाणावर वाढलं असून देखील कर्मचारी संख्या मात्र वाढवली जात नाही असा आरोप कर्मचारी संघटनेकडून करण्यात आला आहे. यावर तोडगा काढावा अशी मागणी करत बँकेच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे.