Baramati Assembly Election 2024 : शरद पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघात झंझावती दौरा केला. (Sharad Pawar) या दौऱ्यात विविध ठिकाणी त्यांनी मतदारांना मार्गदर्शन केलं. युगेंद्र पवार यांचा प्रचार करताना मतदारांना मतदान करण्याचं आवाहनही शरद पवार यांनी केलं. दरम्यान, त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला. कामगारांना दमबाजी करणाऱ्यांना देखील त्यांनी इशारा दिला. मला त्या रस्त्यानं जायला लावू नका, असा थेट इशारा देखील पवारांनी दिला.
शरद पवार काय म्हणाले?
आजचे राज्यकर्ते शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक करत नाहीत. जो शेतकऱ्यांचं हित बघत नाही, त्याचं माझं जमत नाही. समाजकारण बदलायचं असेल तर अर्थकारण बदललं पाहिजे. अर्थकारण बदलायचं असेल तर शेतीचा धंदा सुधारला पाहिजे. शेतमालाच्या किंमती वाढल्या पाहिजेत, खत औषधाच्या किमती कमी झाल्या पाहिजेत. तरच खऱ्या अर्थानं परिवर्तन येईल आणि ते परिवर्तन आणायचं आहे. ते आपण सगळ्यांनी ठरवलं तर येऊ शकतं. त्यासाठी सत्ता परिवर्तन हा निकाल घ्यावा लागेल, असंही शरद पवार यावेळी म्हणाले.
माझी विनंती आहे जे कुणी संचालक असतील, चेअरमन असतील, व्हाईस चेअरमन असतील. या कारखान्याच्या संस्थेच्या हितासाठी माझ्याकडे पन्नास वेळा आले असतील. मी पक्ष बघत नाही, मी त्याची जात बघत नाही. माझ्या दृष्टीनं जात एकच ती म्हणजे शेतकरी होय. कुठलाही साखर कारखाना, सहकारी संस्था अडचणीत आल्यानंतर पक्ष बघितला नाही, माझ्या हातात सत्ता होती तोपर्यंत मी पक्ष बघितला नाही, काही बघितलं नाही. सरसकट मदत केली. त्याला तुमचा कारखाना अपवाद नाही, असं शरद पवार म्हणाले.
आम्ही कधी चुकीच्या रस्त्यानं जात नाही. लोकशाहीत प्रचार करायचा, मत द्यायचा तुमचा अधिकार आहे. कुणाचा प्रचार करायचा हा त्याचा अधिकार आहे. लोकांना तुम्ही दमदाटी करायला लागला तर हे सहन केलं जाणार नाही, असा इशारा शरद पवार यांनी दिला. ज्या गावच्या बोरी, ज्या गावच्या बाभळी, त्यामुळं तुम्ही भानगडीत पडू नका. पुन्हा माझ्या कानावर बाब आली तर मी आहे या ठिकाणी, कुणी तुम्हाला वाचवू शकणार नाही असा थेट इशाराच पवारांनी दिला आहे.
मला या रस्त्यानं जायचं नाही. माणसं आपली आहेत, चुकली असतील, कुणी तरी त्यांना दम दिला असेल त्यामुळं त्यांनी असं केलं असेल. त्यांना सांगणं आहे आपल्या भागात आतापर्यंत जे कुणी केलं नाही ते करु नका, असा इशारा शरद पवार यांनी दिला. कायद्यानं सर्वांना समान अधिकार आहेत. पंतप्रधान आणि तुम्हाला एकच मत आहे. मुख्यमंत्र्यांना देखील एक मत आहे. लोकशाहीच्या विरुद्ध कुणी जाऊ नका हे सांगणं आहे, असं शरद पवार म्हणाले.