लंडनमध्ये राहणारे भारतीय डॉक्टर संग्राम पाटील (Mumbai) यांना आज शनिवार (दि. 10 जानेवारी)रोजी पहाटे मुंबई पोलिसांनी विमानतळावरून ताब्यात घेतलं. लंडनहून मुंबईत आल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. मोदी सरकारच्या धोरणांविरोधात बोलत असल्याने ही कारवाई केल्याचं समोर आलं. मात्र, भाजपच्या पदाधिकाऱ्याने तक्रार केल्याचंही पुढं आलं आहे.
पहाटे ताब्यात घेतल्यावर साधारण दुपारी ३ च्या सुमारास संग्राम पाटील यांना चौकशी करून सोडण्यात आलं. याबाबत पत्रकारांशी बोलताना संग्राम पाटील म्हणाले की, मी फेसबुकवरून सरकारविरोधात लिखाण करत असतो, त्यातील काही पोस्ट सरकारच्या लोकांना आवडल्या नाहीत. त्यांनी पोलिसांकडं तक्रार करून एफआयआर केली होती. त्यामुळे आज मला पोलिसांनी ताब्यात घेतलं. दिवसभर चौकशी करून संध्याकाळी मला नोटीस दिली असं त्यांनी सांगितलं.
सडेतोड राजकीय भूमिका घेणाऱ्या डॉ. संग्राम पाटलांना मुंबई विमानतळावरून पोलिसांनी घेतले ताब्यात
त्याचबरोबर कुठल्या तरी एका राजकीय पक्षाची पोस्ट आहे. त्याच्यासोबत मला क्लब करून टाकले आहे. त्यामुळे हे प्रकरण गुंतागुतीचे आहे. मला त्यावर लगेच भाष्य करता येणार नाही. हा चौकशीचा भाग आहे. चौकशीतून निष्कर्ष काढला जाईल. मी सध्या थकलोय. साधारण ३५-४० तास प्रवास करून मी मुंबईत आलो. पहाटे २ पासून मला ताब्यात घेत चौकशी करत होते. मी माझी कायदेशीर बाबू तपासेन. तज्त्रांकडून सल्ला घेऊन मी माझा लढा लढेन असंही डॉ. संग्राम पाटील म्हणाले आहेत.
दरम्यान, पुढे आलेल्या माहितीनुसार संग्राम पाटील यांनी सत्ताधारी पक्षाविरोधात चुकीची माहिती पसरवून नेत्यांविरोधात अपमानास्पद टिप्पणी करतात, असा आरोप भाजपचे माध्यम कक्ष प्रतिनिधी निखिल भामरे यांनी तक्रारीत केला आहे. त्यामुळे पोलिसांनी संग्राम पाटील यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, चौकशीनंतर सोडून देण्यात आल्याचं संग्राम पाटील यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे. तसेच या प्रकरणात आपण कायदेशीर मार्गाने पुढे जाणार असल्याचं संग्राम पाटील यांनी सांगितलं आहे.
