Big blow to BJP-Shiv Sena in Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज उमेदवारी अर्जांची छाननी सुरू असून, या प्रक्रियेत काही प्रमुख राजकीय पक्षांना अनपेक्षित धक्के बसल्याचे चित्र समोर आले आहे. भाजप(BJP) आणि शिंदेंची शिवसेना(Shivsena) या सत्ताधारी युतीतील एकूण पाच उमेदवारांचे एबी फॉर्म छाननीदरम्यान बाद झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
भाजपला सर्वात मोठा धक्का थेरगाव प्रभाग क्रमांक 24 मध्ये बसला आहे. या प्रभागातून भाजपच्या अधिकृत उमेदवार शालिनी गुजर, गणेश गुजर आणि करिश्मा बारणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, त्यांचे एबी फॉर्म वेळेत निवडणूक अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले नसल्याचे कारण पुढे करून छाननीदरम्यान हे अर्ज बाद ठरवण्यात आले. परिणामी, भाजपची अधिकृत उमेदवारी नाकारली गेल्याने या तिघांनाही आता अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागणार आहे. या घटनेमुळे पक्षाच्या स्थानिक संघटनात्मक यंत्रणेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
पुण्यातील बॉम्बस्फोटात शस्त्र पुरवल्याचा आरोप असलेल्या बंटी जहागीरदारवर दिवसाढवळ्या गोळीबार
दरम्यान, शिंदेंच्या शिवसेनेला देखील छाननी प्रक्रियेत धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक 30 फुगेवाडी-दापोडी येथील उमेदवारांचे तसेच प्रभाग क्रमांक १९ चिंचवडगाव येथील एका उमेदवाराचा अर्ज सुचक आणि अनुमोदक या तांत्रिक मुद्यावर बाद करण्यात आला आहे. आवश्यक त्या निकषांची पूर्तता न झाल्याने हे अर्ज वैध ठरू शकले नाहीत, अशी माहिती निवडणूक सूत्रांकडून देण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी आज दिवसभर उमेदवारी अर्जांची छाननी सुरू असून, या प्रक्रियेत आणखी दोन ते तीन उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे येत्या काही तासांत राजकीय समीकरणांमध्ये आणखी बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्ज छाननीनंतर चित्र स्पष्ट होणार असून, त्यानंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. या घडामोडींमुळे निवडणूक रणधुमाळीला अधिकच वेग येण्याची चिन्हे दिसत आहेत.
