पुण्यातील बॉम्बस्फोटात शस्त्र पुरवल्याचा आरोप असलेल्या बंटी जहागीरदारवर दिवसाढवळ्या गोळीबार
श्रीरामपूर शहरात दिवसाढवळ्या बेधुंद गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना; गोळीबारात बंटी जहागीरदार गंभीर जखमी झाला.
Bunty Jagirdar shot in broad daylight : पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात आरोपींना शस्त्र पुरविल्याच्या आरोपाखाली चर्चेत असलेला असलम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागीरदार(Bunty Jahagirdar) (रा. वार्ड क्रमांक 2, ता. श्रीरामपूर) याच्यावर आज श्रीरामपूर शहरात दिवसाढवळ्या बेधुंद गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गोळीबारात बंटी जहागीरदार गंभीर जखमी झाला असून, या घटनेमुळे संपूर्ण श्रीरामपूर(Shrirampur) शहरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बंटी जहागीरदार हा कब्रस्तानातून बाहेर पडत असताना श्रीरामपूर शहरातील जर्मन हॉस्पिटलसमोरील मुख्य दरवाजाजवळ दबा धरून बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी अचानक त्याच्यावर गोळीबार केला. एकामागून एक गोळ्या झाडण्यात आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. गोळीबाराचा आवाज होताच नागरिकांमध्ये एकच पळापळ उडाली.
गोळीबारानंतर गंभीर जखमी अवस्थेत बंटी जहागीरदारला तातडीने श्रीरामपूर येथील कामगार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी त्याला तत्काळ अहिल्यानगर येथील रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला. सध्या त्याच्यावर अहिल्यानगरमधील साईदीप रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पक्षासाठी आम्ही मेहनत केली अन् उमेदवारी उपऱ्यांना दिली, राज्यभरात भाजप कार्यकर्ते आक्रमक
दरम्यान, हल्ल्यानंतर अज्ञात हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले असून, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. शहरभरात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या घटनेमुळे श्रीरामपूर शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सतर्क आहे. बंटी जहागीरदारवर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती असून, या गोळीबारामागे जुना वाद, टोळीतील संघर्ष की गुन्हेगारी टोळ्यांमधील अंतर्गत वर्चस्वाची लढाई आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.
या दिवसाढवळ्या झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलीस लवकरच आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
