डॉक्टरच्या घरात घुसून मारहाण; 5 लाखांची मागणी केल्याचा आरोप, ‘बिग बॉस’ फेम दिव्या शिंदेला अटक

Shinde : बिग बॉस मराठी फेम दिव्या शिंदेविरोधात पुण्यातील 65 वर्षीय निवृत्त डॉक्टरच्या घरात घुसून मारहाण, आरोपीवर गुन्हा दाखल.

News Photo   2026 09 27T180431.654

Case registered against Divya Shinde.

‘बिग बॉस मराठी’ची माजी स्पर्धक (Shinde) आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर दिव्या शिंदेला पुण्यातील निवृत्त डॉक्टरच्या घरात घुसून मारहाण आणि 5 लाख रुपयांची मागणी केल्याच्या प्रकरणात अखेर अटक करण्यात आली आहे. 65 वर्षीय निवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्याधर गायकवाड यांच्या तक्रारीनंतर काळेपडळ पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या प्रकरणात दिव्याविरोधात गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

डॉ. गायकवाड हे 2021 मध्ये पुणे कॅन्टोन्मेंट रुग्णालयातून वैद्यकीय अधिकारी म्हणून निवृत्त झाले आहेत. ते ‘करुणादीप फाउंडेशन’शी संबंधित असून या संस्थेकडून 1 ते 3 सप्टेंबरदरम्यान बालगंधर्व रंगमंदिरात ‘कला आविष्कार महोत्सव’ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला दिव्या शिंदे उपस्थित राहिली होती. मात्र, कार्यक्रमासाठी तिला अधिकृत निमंत्रण देण्यात आलं नव्हतं, असा दावा डॉ. गायकवाड यांचे बंधू महेंद्र यांनी केला आहे.

‘बिग बॉस मराठी’ फेम दिव्या शिंदेविरोधात गुन्हा दाखल; 5 लाखांसाठी डॉक्टरला मारहाण

कार्यक्रमानंतर दिव्या शिंदेने आपण सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असल्यामुळे कार्यक्रमाला प्रसिद्धी मिळाल्याचा दावा करत 5 लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. डॉ. गायकवाड यांनी तिला गुगल पेद्वारे सुमारे 50 हजार रुपये दिले होते. मात्र, उर्वरित रक्कम देण्यासाठी तिच्याकडून दबाव टाकला जात असल्याचं महेंद्र यांनी तक्रारीत म्हटलं आहे.

यानंतर 17 सप्टेंबर रोजी दिव्या शिंदे, अण्णा ढमढेरे आणि इतर काही जण मोहम्मदवाडी येथील डॉ. गायकवाड यांच्या घरी गेले. घरात प्रवेश केल्यानंतर 5 लाख रुपयांची मागणी करण्यात आली आणि डॉ. गायकवाड यांना मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर महेंद्र यांनी पोलिसांसह घटनास्थळी धाव घेतली. जखमी डॉ. गायकवाड यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

या प्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात दिव्या शिंदेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तिला अखेर अटक केली आहे. दरम्यान, दिव्या शिंदेच्या वकिलांनी हे आरोप फेटाळले असून तिच्याविरोधात खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा केला आहे. त्यामुळे अटकेनंतर या प्रकरणाच्या पुढील तपासाकडे लक्ष लागलं आहे.

Exit mobile version