Download App

BJP Ahilyanagar President :  भाजपच्या नगर शहराध्यक्षपदाचं घोड कुठं आडलं?

BJP Ahilyanagar President :  भारतीय जनता पार्टीच्या (BJP) नवीन जिल्हाध्यक्षांची निवड जाहीर करण्यात आली असून अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यात

BJP Ahilyanagar President :  भारतीय जनता पार्टीच्या (BJP) नवीन जिल्हाध्यक्षांची निवड जाहीर करण्यात आली असून अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यात पुन्हा एकदा दक्षिणमध्ये दुसऱ्यांदा दिलीप भालसिंग (Dilip Bhalsingh) यांना संधी देण्यात आली आहे तर उत्तर जिल्हाध्यक्षपदी नितीन दिनकर (Nitin Dinkar) यांचे नाव जाहीर झाले आहे. मात्र नगर शहराध्यक्ष पदाची निवड अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.  भारतीय जनता पक्षाच्या दक्षिण व उत्तर जिल्हाध्यक्ष निवडी जाहीर झाल्या असल्या, तरी शहराध्यक्ष पदाची निवड जाहीर झाली नसल्याने पक्षांतर्गत या पदासाठी सुरु असलेली रस्सीखेच समोर येत आहे.

तसेच राम शिंदे गट व विखे गट यांनी आपपल्या इच्छुकांची नावे पक्षश्रेष्टींकडे सोपवली आहे मात्र येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवत विचारविनिमय पूर्वक हे नाव जाहीर केलं जाईल असे चित्र दिसते आहे.

नगर जिल्ह्यामध्ये नवा विरुद्ध जुना असा वाद सुरू झाला होता. यावेळेला सभापती राम शिंदे यांनी जुन्या कार्यकर्त्यांना पाठबळ देण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा भाजपमध्ये होती व त्या अनुषंगाने त्यांनी बैठका घेण्यास सुरुवात केली होती. सलग बैठका घेऊन त्यांनी जुन्या लोकांना संधी दिली जावी अशी भूमिका मांडली असल्याचे बोलले जात आहे. याचाच प्रत्यय म्हणजे भाजपच्या उत्तर व दक्षिण जिल्हाध्यक्षपदाची धुरा ही जुन्या व पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या व्यक्तींकडे सोपवण्यात आली. दरम्यान भाजपचे नगर शहराध्यक्ष निवडीबाबत राम शिंदे (Ram Shinde) गटाकडून जुन्या व एकनिष्ठांना संधी देण्यात यावी अशी मागणी असल्याचे बोललं जात आहे.

तर, दुसरीकडे राज्याचे जलसंधारणमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांचेही पक्षाच्या अंतर्गत निवडी करताना सर्वांना समान संधी द्यावी अशी भूमिका मांडत पश्रश्रेष्टींकडे जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्षपदासाठी विखे गटाकडील नावे सुचविली होती. यामुळे भाजपमध्ये उघड दोन गट झाल्याचे चित्र नगर जिल्ह्यामध्ये दिसून येत आहे. यामुळे जिल्हाध्यक्षांची निवड जरी जाहीर झाली असली तरी शहराध्यक्षाची निवड अद्याप बाकी आहे.

आगामी निवडणुका पाहता सक्षम नेतृत्वाची गरज

येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहे. यामुळे स्थानिक पातळीवर शहराध्यक्ष यांची निवड करताना गटतट बाजूला ठेवत सर्वाना सोबत घेऊन जाणारा असा व्यक्ती शहराध्यक्षपदी असावा. तसेच येणाऱ्या निवडणुका पाहता राजकीय तुल्यबळ असणाऱ्याला प्राधान्य दिले जाईल अशी देखील चर्चा सुरु आहे. शहराध्यक्ष निवडीवरून पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आला तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये अडचणीला सामोरे जावे लागू शकते अशी देखील चिंता पक्षश्रेष्ठींना सतावत आहे.

या ठिकाणच्या निवडी रखडल्या

बीड, वर्धा, चंद्रपूर आणि नाशिक या ठिकाणच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडी अद्याप रखडल्या आहेत. भाजपच्या अंतर्गत वादामुळे या निवडी रखडल्या गेल्याचे बोलले जात आहे. यातच नगरमध्ये जिल्हाध्यक्षपदाच्या निवडी झाल्या मात्र शहराध्यक्ष पदाची निवड बाकी आहे. नगर शहरात सध्या शिंदे व विखे गटामध्ये नवा विरुद्ध जुना असा वाद चांगलाच पेटला आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी दिली गेली पाहिजे, ही भूमिका मुंबईमध्ये जाऊन निष्ठावंत गटाने पुन्हा एकदा पक्षश्रेष्टींसमोर मांडली आहे. त्यामुळे पक्षापुढे आता नवीन पेच निर्माण झाला आहे.

पुणे भाजपचे पुन्हा धीरज घाटेच कारभारी.. बिडकर, भिमालेंच्या पदरी निराशा…

शहराध्यक्षपदासाठी हे आहेत इच्छुक

सुवेंद्र गांधी, बाबासाहेब वाकळे, अभय आगरकर, सचिन पारखे, धनंजय जाधव, बाबासाहेब सानप यांची नावे इच्छुकांच्या यादीत असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान अभय आगरकर हे नगर शहराध्यक्ष राहिले आहे. त्यांना मानणारा मोठा गट भाजपात आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुका पाहता पुन्हा एकदा शहराध्यषकपदाची धुरा त्यांच्याकडे सोपवण्यात यावी अशी मागणी आगरकर समर्थक करत आहे. तर नव्या चेहऱ्यानं संधी देण्यात यावी अशी मागणी करत विखे गटाकडून धनंजय जाधव यांच्या नावासाठी पुढाकार घेण्यात येत आहे. दरम्यान शहराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

follow us