राष्ट्रवादीकडे असलेली जागा यावेळी भाजपच्या निशाण्यावर; अहिल्यानगर विधान परिषदेसाठी राजकीय हालचालींना वेग

राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणांचा परिणाम आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघांवरही उमटताना दिसत आहे.

Untitled Design 58

Untitled Design 58

BJP eyeing NCP seat in Ahilyanagar : अहिल्यानगर विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटपावरून मोठी रस्सीखेच होण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत. राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणांचा परिणाम आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघांवरही उमटताना दिसत आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे केवळ स्थानिक राजकारण म्हणून नव्हे, तर महायुतीतील अंतर्गत शक्तीपरीक्षेच्या दृष्टीनेही पाहिले जात आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यसंख्या लक्षात घेऊन प्राथमिक स्तरावर चर्चा सुरू झाली असून, ज्या पक्षाकडे अधिक संख्याबळ आहे त्या पक्षाकडून संबंधित विधान परिषद जागेवर दावा करण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट आणि शिंदे गटाची शिवसेना या तिन्ही पक्षांमध्ये जागेसाठी स्पर्धा रंगण्याची शक्यता आहे.

उमेदवारीबाबतही अनेक नावांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून माजी आमदार चंद्रशेखर घुले हे इच्छुक मानले जात आहेत. ग्रामीण भागात त्यांचा संपर्क आणि संघटनात्मक ताकद लक्षात घेता त्यांचे नाव गंभीरपणे चर्चेत आहे. त्याचबरोबर आमदार संग्राम जगताप यांचे बंधू सचिन जगताप यांचेही नाव पुढे येत असून, स्थानिक पातळीवरील समीकरणांमध्ये त्यांना महत्त्वाचा पर्याय मानले जात आहे.

दुसरीकडे भाजपकडून खासदार सुजय विखे यांचे नाव चर्चेत असून, त्यांच्यासोबत धनश्री विखे यांच्या नावाचीही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. जिल्ह्यातील भाजपचे वाढते संख्याबळ आणि संघटनात्मक प्रभाव लक्षात घेता भाजप या जागेवर जोरदार दावा करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, भाजपकडे सर्वाधिक मतदारसंख्या असल्याने पक्षाकडून संख्याबळ आमचे, त्यामुळे जागाही आमची अशी भूमिका घेतली जाऊ शकते.

समान फी पण वेगळी वागणूक? RCC च्या फोटॉन बॅच मागचं गुपित समोर; NEET स्कॅममुळे कोचिंग इंडस्ट्रीवर प्रश्नचिन्ह

तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून सुजित झावरे यांचे नाव चर्चेत आले आहे. जिल्ह्यात शिंदे गट आपली ताकद वाढवण्याच्या प्रयत्नात असून, विधान परिषद निवडणूक ही त्यासाठी महत्त्वाची संधी मानली जात आहे. याचदरम्यान आणखी एक राजकीय चर्चा रंगली आहे. राहुरी पोटनिवडणुकीत माघार घेतलेले प्राजक्त तनपुरे यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेची संधी देण्याचे आश्वासन दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे अंतिम क्षणी समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी, महायुतीत कोणाला प्राधान्य मिळणार आणि कोणाच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब होणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

अहिल्यानगर मतदारसंघातील आकडेवारी पाहिली तर या निवडणुकीचे महत्त्व अधिक स्पष्ट होते. या मतदारसंघात एकूण 461 मतदार आहेत. त्यामध्ये भाजपकडे सर्वाधिक 199 सदस्यसंख्या आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडे सुमारे 50 सदस्य आहेत. शिंदे गटाच्या शिवसेनेकडे 48 सदस्य असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडे 35 सदस्य आहेत. विजयासाठी आवश्यक असलेला आकडा 231 मतांचा आहे. त्यामुळे कोणत्याही एका पक्षाला स्वतंत्रपणे विजय मिळवणे शक्य नसून, मित्रपक्षांचे समर्थन आणि आघाडीतील अंतर्गत समन्वय निर्णायक ठरणार आहे.

गेल्या वेळी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती. मात्र राज्यातील सत्तांतर, पक्षफुटी आणि बदललेली राजकीय समीकरणे पाहता यावेळी परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. भाजप या जागेवर मजबूत दावा करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसही ही जागा कायम राखण्यासाठी सक्रिय झाली आहे. त्यामुळे उमेदवारीपासून ते मतदानापर्यंत प्रत्येक टप्प्यावर राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.

आगामी काही दिवसांत महायुतीतील वरिष्ठ नेत्यांच्या बैठका आणि स्थानिक पातळीवरील राजकीय हालचाली अधिक वाढण्याची शक्यता असून, अखेर कोणाच्या गळ्यात विधान परिषदेची माळ पडते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Exit mobile version