BJP gives opportunity to tribal woman in Rajya Sabha : भाजपच्या गोटातून एक अत्यंत महत्वाची राजकीय घडामोड समोर आली आहे. राज्यसभेच्या 2026 च्या निवडणुकीसाठी भाजपने महाराष्ट्रातील उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली असून या यादीत काही अनुभवी नेत्यांसह एका नव्या चेहऱ्याला देखील मोठी संधी देण्यात आली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरूवात झाली आहे.
भाजपकडून केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि रामदास वडकुते यांना राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र या यादीतील सर्वाधिक चर्चेचं नाव ठरत आहे ते, नागपूरच्या माजी महापौर मायाताई चिंतामण इवनाते यांचं. नुकत्याच नागपूर महानगरपालिकेत नागसेवक म्हणून निवडून आलेल्या मायाताई इवनाते यांना थेट राज्यसभेची उमेदवारी देत भाजपने मोठा राजकीय संदेश दिला असल्याचं बोललं जात आहे.
मायाताई इवनाते या आदिवासी समाजातून येतात आणि गेली अनेक वर्षे नागपूर शहर भाजपमध्ये सक्रियपणे कार्यरत आहेत. स्थानिं स्वराज्य संस्थांपासून ते राष्ट्रीय स्तरावरील जबाबदाऱ्या सांभाळण्याचा त्यांना मोठा अनुभव आहे. 2002 साली त्या प्रथमच भाजपच्या नगरसेवक म्हणून निवडून आल्या. त्यानांतर 15 डिसेंबर 2007 ते 23 डिसेंबर 2009 या कालावधीत त्यांनी नागपूर महानगरपालिकेच्या महापौरपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली. 2012 मध्ये त्या पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून आल्या आणि भाजप प्रदेश उपाध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम पाहिले.
2017 मध्ये त्यांची राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्य सदस्यपद नियुक्ती झाली. आदिवासी समाजाच्या प्रश्नांवर काम करत त्यांनी आपली वेगेळी ओळख निर्माण केली. 2026 मध्ये नागपूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 12 मधून त्या पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून आल्या असून सध्या त्या मनपा नागपूरच्या अग्निशमन समितीच्या सभापतीपदाच्या जबाबदारी सांभाळत आहेत. स्थानिक पातळीवरून सुरू झालेला त्यांचा राजकीय प्रवास आता थेट संसद भवनाच्या दालनात पोहोचण्याच्या उंबरठ्यावर आहे.
बाप काढायचा अधिकार कुणी दिला?’ अधिवेशनात भास्कर जाधव आणि सचिन कल्याणशेट्टी यांच्यात खडाजंगी
भाजपकडून आदिवासी समाजाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न आणि संघटनांत दीर्घकाळ काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देण्याची रणनीती या उमेदवारीतून स्पष्ट होत असल्याचं राजकीय विश्लेषकांचे मत आहे. विशेष म्हणजे नुकत्याच निवडून आलेल्या नगरसेविकेला थेट राज्यसभेवर पाठवणायचा निर्णय धाडसी आणि राजकीयदृष्ट्या महत्वाचा मानला जात आहे.
दरम्यान, राज्यसभा निवडणुकीचं वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आलं आहे. 5 मार्च ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असून 6 मार्च रोजी अर्जाची छाननी होणार आहे. 9 मार्च ही उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख असून 16 मार्च रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 या वेळेत मतदान पार पडणार आहे. सायंकाळी 5 नंतर मतमोजणीला सुरूवात होईल.
एकूणच भाजपने जाहीर केलेल्या या उमेदवारीमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. आता या निवडणुकीत पुढे कोणते राजकीय समीकरणं आकार घेतात आणि विरोधकांची रणनीती काय असते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
