पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे(Narendra Modi) बोट दाखवण्याआधी स्वत:ची कारकीर्द तपासा, अशा खोचक शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) यांनी शरद पवारांवर टोलेबाजी केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवरुन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला होता. त्यांच्या टीकेवर बावनकुळेंनी पवारांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
भारताविरोधात घोषणाबाजी करणाऱ्यांना शिवेसेनेच्या युवा नेत्याने भर कोर्टात चोपले
बावनकुळे म्हणाले, शरद पवार यांना आपल्या पक्षाचा राष्ट्रीय दर्जा टिकवता आला नाही, ते पवारसाहेब आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करीत आहेत. पवार साहेब तुम्ही राजकारण करताना कायम साडेतीन जिल्ह्यांचाच विचार केला आणि आज भाजप देशभरात कुठल्या राज्यात आहे आणि कुठल्या राज्यात नाही हे गणित सांगत सुटला आहात, असाही टोला त्यांनी लगावला आहे.
नगरच्या कलाकाराची कलाकृती झळकणार थेट अयोध्येत, रामायणातील थ्रीडी मॉडेल साकारणार
तसेच मोदीजी पुन्हा येणार नाहीत असे भाकीत तुम्ही केले पण तुमचे हे भाकीत खरे होणार नाही. कारण जनता मोदीजींच्या पाठीशी कालही होती आणि आजही आहे. समाजात द्वेष निर्माण करण्याचे काम कुणी केले हे महाराष्ट्रातील जनतेने तुमचे सरकार असताना पाहिलेय. त्यामुळे मोदीजींकडे बोट दाखवण्यापूर्वी एकदा आपली कारकीर्द तपासून बघा,” असा सल्लाही बावनकुळे यांनी पवारांना दिला आहे.
बाकी परिवार बचाव पार्टीला सोबत घेऊन तुम्ही कितीही ‘घमंडीया’ ची मोट बांधण्याचा प्रयत्न केला तरीही देशातील जनता २०२४ मध्ये सुद्धा मोदीजी आणि भाजपलाच साथ देणार असल्याचा विश्वासही चंद्रशेखर बावनकुळेंनी यावेळी व्यक्त केला आहे. दरम्यान, देशातील अनेक राज्यांमध्ये भाजपची सरकारे नाहीत. ज्या राज्यात सरकारे आहेत, ती आमदार फोडून आणलेली आहेत, असा हल्लाबोल शरद पवार यांनी भाजपवर केला होता.