Pankaja Munde : लोकसभा निवडणुकीत राज्यातील ज्या मतदारसंघांची चर्चा होती त्यातीलच एक बीड मतदारसंघ. या निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा (Pankaja Munde) पराभव झाला. पंकजांचा पराभव त्यांच्या समर्थकांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. भाजपातील मोठ्या नेत्याचा पराभवाचा धक्का महायुतीलाही बसलाय. पंकजांच्या पराभवाने मराठवाड्यात भाजपाची मोठी पिछेहाट झाली आहे. खरंतर पंकजा मुंडेंचं पुनर्वसन करण्याच्या उद्देशानेच त्यांना लोकसभेचं तिकीट (Beed Lok Sabha) देण्यात आलं होतं. मात्र येथे त्यांना यश मिळालं नाही. परंतु, आता भाजपने त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी हालचाली सुरू केल्याची माहिती आहे.
राजधानी दिल्लीत भाजप नेत्यांची एक महत्वाची बैठक झाली. या बैठकीत पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवण्याबाबत चर्चा झाल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे. यंदा लोकसभा निवडणुकीत पीयूष गोयल आणि उदयनराजे भोसले निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांच्या राज्यसभेच्या जागा रिक्त झाल्या आहेत. यापैकी एका जागेवर पंकजा मुंडे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. दिल्लीत झालेल्या या बैठकीत भाजप नेत्यांनी पंकजा मुंडेंना राज्यसभेत घ्या, अशी विनंती पक्ष नेतृत्वाला केल्याचे समजते.
‘पंकजा मुंडे अन् जानकरांच्या पराभवासाठी जरांगेंनी बैठका घेतल्या’ लक्ष्मण हाकेंचा दावा
बीड मतदारसंघातील निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला होता. महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे विजयी झाले. बीडमधील निवडणूक राज्यात गाजली. कारण येथे अतिशय अटीतटीची लढत झाली. मतमोजणीत फेरीगणिक लीड कमी जास्त होत होते. अखेर शेवटच्या फेरीत बजरंग सोनवणे यांनी विजयी आघाडी घेत पंकजा मुंडेंचा पराभव केला. पंकजा मुंडेंच्या पराभवाचा मोठा धक्का त्यांच्या समर्थकांना बसला. परंतु, आता त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी भाजपने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यांना राज्यसभेवर संधी मिळाल्यास समर्थकांना मोठा दिलासा मिळू शकतो.
पंकजा मुंडे मागील काही दिवसांपासून भाजपात दुर्लक्षित झाल्या होत्या. विधानसभा, विधानपरिषदेसाठी त्यांच्या नावाची चर्चा व्हायची मात्र संधी काही मिळत नव्हती. याआधीच्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठीही त्यांच्या नावाची चर्चा होती मात्र भाजपाच्या यादीत त्यांचं नाव नव्हतं. त्यामुळे समर्थकांतून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत मात्र पंकजा मुंडे यांना त्यांच्या बहिण प्रीतम मुंडे यांच्याऐवजी उमेदवारी देण्यात आली होती. परंतु, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.
‘संकटातून वाचवण्यासाठी बीडच्या बप्पाचा दादांना फोन’ सोनवणेंबाबत मिटकरींचा खळबळजनक दावा
यानंतर पंकजा मुंडेंच्या आगामी राजकारणाच्या दृष्टीने त्यांना अधिक ताकद देण्याचं भाजपनं ठरवल्याचं दिसत आहे. म्हणूनच दिल्लीत झालेल्या महत्वाच्या बैठकीत राज्यसभेसाठी त्यांचं नाव पुढे आलं. भाजप नेत्यांनी पक्ष नेतृत्वाकडे विनंती केल्याचीही माहिती मिळाली आहे. तेव्हा आता या विनंतीवर पक्ष नेतृत्व काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.