Download App

“नंदू जोशींनी शरीर सुखाची मागणी केली होती… त्यांना अटक करा” : पीडित महिलेचे उपोषणाचे हत्यार

डोंबिवली : भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण यांचे निकटवर्ती आणि डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष नंदू जोशी यांच्यावरील विनयभंगाच्या गुन्ह्यामुळे शिवसेना विरुद्ध भाजप यांच्यातील वाद दिवसेंदिवस विकोपाला जाताना दिसत आहे. अशात २ पक्षांच्या वादात मूळ प्रकरणाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत पीडित महिला उपोषणाला बसली आहे. पंतप्रधान, उपमुख्यमंत्री आणि महिला आयोग मला न्याय देणार की नाही, असा संतप्त सवाल करत नंदू जोशी यांना अटक करत नाही तो पर्यंत उपोषण सोडणार नाही, अशी भूमिका पीडित महिलेने घेतली आहे.

याबाबत पीडित महिलेने माध्यमांशी बोलताना सांगितले की, मी ४ दिवसांपासून उपोषणाला बसली आहे. नंदू जोशी यांना अटक करावी आणि मला न्याय द्यावा. त्यांनी माझ्याकडे शरीर सुखाची मागणी केली होती. ते माझ्या नवऱ्याचे मित्र होते, त्या दोघांचे पार्टनरशीपमध्ये व्यवसाय चालू आहेत. त्यामुळे त्याच आमच्या घरी येणं जाणं होते, असं म्हणतं आता जोशी यांना अटक व्हावी आणि पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांना परत आणावे हीच माझी मागणी आहे. तोपर्यंत उपोषण सोडणार नाही, असेही पीडित महिलेने सांगितले.

सीएम शिंदेंकडून फडणवीसांना बगल; जाहिरातबाजीवर दरेकर आक्रमक

काय आहे प्रकरण?

नंदू जोशी यांच्याविरोधात काही दिवसांपूर्वी एका महिलेने मानपाडा पोलिस स्थानकात विनयभंगाची तक्रार दाखल केली. या दाखल तक्रारीवरुन मानपाडा पोलिसांनी जोशी यांच्यावर गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. मात्र हा गुन्हा दाखल होताच भाजपच्या वतीने मानपाडा पोलिस ठाण्यावर भव्य मोर्चा काढत वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या बदलीची मागणी करण्यात आली.

याप्रकरणी कोणतीही सखोल चौकशी न करता पोलिसांनी हा गुन्हा राजकीय दबावामुळे दाखल केला असल्याचे भाजपच्या नेत्यांचे म्हणणे आहे. पक्षातील नेत्यांना लक्ष्य करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे, असा आरोप करण्यात येत आहे. यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार बागडे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. मात्र बागडे यांची बदली करावी अशी मागणी सध्या भाजपच्या वतीने लावून धरली आहे.

Shivsena Advertisement : भल्या मोठ्या जाहिरातीवर CM शिंदेंचं थोडक्यात उत्तर

शेखर बगाडे वादग्रस्त अधिकारी :

शेखर बागडे हे सत्ताधारी पक्षातील एका वरिष्ठ नेत्याच्या जवळचे असल्याची चर्चा कळवा, मुंब्रा, दिवा, डोंबिवली, कल्याण या परिसरात आहे. मुंब्रा येथून बदली होऊन आल्यानंतर ते एकाच पक्षातील नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना जुमानत असल्याने भाजप आणि मनसे या पक्षाचे पदाधिकारी नाराज असल्याचं बोललं जातं. २०२१ मध्ये तत्कालिन मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही बागडे यांच्याविरोधात आवाज उठवला होता.

बागडेंमुळे भाजप – शिवसेनेत मिठाचा खडा :

दरम्यान, बागडे यांची बदली होत नाही तोपर्यंत कल्याणमध्ये शिवसेना आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे काम करणार नाही असा निर्णय भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. तसा ठरावच एका बैठकीत संमत करण्यात आला आहे. या ठरावानंतर काही शुल्लक कारणांसाठी शिवसेना-भाजप युतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचे स्वार्थी राजकारण डोंबिवलीतल्या काही नेत्यांकडून सुरू आहे, असा आरोप करत श्रीकांत शिंदे यांनी राजीनाम्याची तयारी दर्शविली.

Disha Patani Birthday: अवघे ५०० रुपये घेऊन मुंबईत आली अन् कोट्यवधींची मालकीण झाली!

खासदार शिंदे यांच्या या भूमिकेमुळे मोठी खळबळ उडाली. याच दरम्यान, भाजपकडून बागडे यांची ईडी किंवा सीबीआय चौकशी करावी अशी मागणी करण्यात येत आहे. या प्रकरणावरुन राजकारण अधिक तापले आहे. मात्र याच सर्व घडामोडींमुळे मूळ मुद्द्याकडे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप करत पीडित महिलेने उपोषणाचे हत्यार उपासले आहे. आज या महिलेच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. आता पोलीस या प्रकरणात पुढे काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags

follow us