भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी काही दिवसांपूर्वी लेट्सअप मराठीला मुलाखती दिली होती. यात त्यांना भाजपचे बीडचे शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांच्या संशयास्पद आत्महत्येबद्दल प्रश्न विचारला होता. पण त्यांनी या प्रकरणावर बोलण्याचे टाळले. सरपंच संतोष देशमुख, महादेव मुंडे या प्रकरणांवर कोणाचीही भीडभाड न ठेवता बोलणारे सुरेश धस भगीरथ बियाणी आत्महत्या प्रकरणावर मात्र हातचे राखून बोलत होते. आता मात्र धस यांनी बियाणी आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केलीय. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेत ही मागणी केली आहे. त्यामुळे सरपंच संतोष देशमुख आणि महादेव मुंडे खून प्रकरणानंतर धस यांनी आणखी एका विषयाला हात घातला आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रावादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही या प्रकरणावर भाष्य केले होते. (BJP’s Beed city president Bhagirath Biyani’s suicide is suspicious)
भगीरथ गंगाभीषण बियाणी. उमदा तरुण, भाजपचे बीड शहराध्यक्ष, पंकजा मुंडे आणि माजी खासदार प्रितम मुंडे यांचे कट्टर समर्थक अशी त्यांची ओळख. 11 ऑक्टोबर 2022 रोजी बियाणी यांनी आत्महत्या केल्याची बातमी समोर आली. स्वत: जवळील परवानाधारक बंदुकीने बियाणी यांनी डोक्यात गोळी झाडली होती. या घटनेने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात खळबळ उडाली होती. त्यांची ही आत्महत्या प्रचंड गूढ विषय ठरला. धाकटे बंधू प्रवीण बियाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्येच्या आदल्या रात्री बियाणींनी आपल्या कुटूंबासमवेत उशिरापर्यंत गप्पा मारल्या. नंतर ते आपल्या खोलीत झोपायला गेले.
11 तारखेला सकाळी ते मुंबईला जाण्यासाठी निघाले होते. मात्र, मळमळ होत असल्याने ते वाटेतून परतले. घरातील खोलीत ते आराम करत होते, याच दरम्यान त्यांनी स्वत:च्या रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळी झाडून घेतली होती. गोळीबाराच्या आवाजाने कुटुंबीयांनी धाव घेत खोलीचा दरवाजा उघडला. त्यावेळी भगीरथ बियाणी रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. यांच्या डोक्यातून रक्त येत असल्याचे आढळले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तिथून जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. तत्कालिन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले होते.
बियाणी यांच्याकडून पिस्तूल साफ करताना ट्रिगर दाबून चुकून गोळी झाडली गेली असावी, असा दावा कुटुंबियांनी केला. भगीरथ बियाणी यांच्या मृत्यूस्थळी सुसाईट नोटही लिहिल्याचे आढळलेले नाही. त्यामुळे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. मात्र बियाणी यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रावादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही या प्रकरणावर भाष्य केले होते. भगीरथ बियाणीने आत्महत्या का केली, त्याच्या पोरीला कुणी छळलं, त्यामुळे अत्याचाराला कंटाळून भगीरथ बियाणीनं आत्महत्या केली की नाही? असा सवाल त्यांनी विचारला होता.
गजाभाऊ या एक्स हॅन्डेलवर काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. यात, बियाणी यांना भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित एका महिलेला परळीत आणण्यास सांगितले होते. त्यासाठी बियाणी यांना 10 ते 15 लाख रुपये देण्यात आले होते. ही बातमी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांना समजताच बियाणी यांना उचलण्यात आले. त्यांच्याकडून काही अक्षेपार्ह व्हिडीओ घेण्यात आले. त्यानंतर त्यांच्या मुलीला पुण्यातून उचलण्यात आले. याच अत्याचाराला कंटाळून बियाणी यांनी आत्महत्या केली, असा दावा करण्यात आला आहे. या दाव्याची शहानिशा लेट्सअप मराठीने केलेली नाही.
त्यामुळे बंदूक साफ करताना चुकून गोळी लागून बियाणी यांचा जीव गेला, की त्यांनी खरंच आत्महत्या केली, आणि या हत्येमागे नेमका कोणाचा हात आहे, हे प्रश्न आजही अनुत्तरित आहेत.