भिवंडीत FDA ची ब्लिंकिटवर कारवाई; खराब अन्नसाठ्याप्रकरणी परवाना निलंबित, गुन्हा दाखल

Blinkit Food Safety Action : कालबाह्य अन्नपदार्थांच्या विल्हेवाटीबाबत पुरावे सादर न झाल्याने अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे.

News Photo   2026 10 26T183843.249

Blinkit Food Safety Action

Blinkit Food Safety Action : अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळावे, तसेच कालबाह्य किंवा खराब अन्नपदार्थ पुन्हा बाजारात विक्रीसाठी येऊ नयेत, यासाठी विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत 21 ऑक्टोबर 2026 रोजी भिवंडी तालुक्यातील पागाव येथील मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड या आस्थापनेची तपासणी करण्यात आली. या वेळी 18,405 कालबाह्य, खराब आणि विक्रीस अयोग्य अन्नपदार्थांच्या नोंदी आढळल्या. या साठ्याचे अंदाजित मूल्य 32,71,774 रुपये असून, त्याची अधिकृत आणि सुरक्षित पद्धतीने विल्हेवाट लावल्याचे स्वतंत्रपणे पडताळता येतील असे पुरावे सादर करण्यात आले नाहीत. त्यामुळे अन्न व्यवसाय परवाना निलंबित करण्यासह कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

तपासणीत संबंधित अन्नसाठ्याची वाहतूक, प्राप्ती आणि अंतिम विल्हेवाट याबाबत संपूर्ण नोंदी उपलब्ध नसल्याचे आढळले. वजनाच्या पावत्या, वाहनांचे तपशील, ई-वे बिल, माल प्राप्तीच्या पावत्या, सीसीटीव्ही नोंदी, वेळेसह छायाचित्रे आणि विल्हेवाट प्रमाणपत्रे यांची पडताळणी करता येईल अशी सलग पुरावा-साखळी सादर झाली नाही. सुनावणीदरम्यान कंपनीचे संचालक विजय राजपुरोहित उपस्थित होते. दोन संस्थांसोबत केलेल्या करारांच्या प्रती सादर केल्याचे सांगण्यात आले; मात्र केवळ करारांवरून अन्नसाठा प्रत्यक्ष उचलून अधिकृतरीत्या नष्ट केल्याचे सिद्ध होत नाही. आणखी चार विक्रेत्यांची नावे देण्यात आली, परंतु त्यांच्याशी संबंधित संपूर्ण करार आणि पूरक नोंदी उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत. या बाबींचा विचार करून परवाना क्रमांक 11525069000472 हा 22 ऑक्टोबर 2026 पासून तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आला. निलंबनाच्या काळात अन्न व्यवसाय चालवण्यास तसेच संबंधित साठ्याची विक्री, वाहतूक, हस्तांतरण, पुन्हा पॅकिंग किंवा लेबल लावणे आणि सक्षम प्राधिकाऱ्याच्या लेखी परवानगीशिवाय विल्हेवाट लावण्यास मनाई करण्यात आली आहे.

तुकाराम मुंढेंच्या निर्देशानंतर FDA ॲक्शन मोडमध्ये, भेसळखोरांविरोधात राज्यभर फेस्टिव्ह क्रॅकडाउन

या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून 23 ऑक्टोबर 2026 रोजी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात एफआयआर क्रमांक 0817/2026 नोंदवण्यात आला. भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 318(4), 275, 61 आणि 223 तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 मधील कलम 59(i) अंतर्गत गुन्ह्याची नोंद झाली आहे. कंपनीचे अधिकारी, विल्हेवाट व्यवस्थापनाशी संबंधित व्यक्ती, पुरवठादार आणि मध्यस्थ यांची भूमिका तपासली जात आहे. यापूर्वी 14 आणि 15 ऑक्टोबर रोजी अन्न व औषध प्रशासनाच्या ठाणे आणि पुणे येथील सात पथकांनी भिवंडी, अंबरनाथ, चाकण आणि निघोजे परिसरातील गोदामे, विल्हेवाट केंद्रे आणि संबंधित आस्थापनांची तपासणी केली होती. या मोहिमेत 48,09,924 रुपये मूल्याचा कालबाह्य किंवा खराब अन्नसाठा आढळला. मूळ तपासणी अहवालानुसार रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्ट्स, रिलायन्स रिटेल, झोमॅटो हायपरप्युअर आणि ब्लिंकिट कॉमर्सच्या निघोजे येथील संबंधित आस्थापनांचे अन्न व्यवसाय परवानेही निलंबित करण्यात आले आहेत. कालबाह्य अन्नाची विल्हेवाट लावल्यानंतर तो साठा पुन्हा बाजारात आणण्यात आला का, याचा पुढील तपास सुरू आहे.

अन्न व औषध प्रशासनाने अन्न व्यावसायिकांना कालबाह्य, खराब, ग्राहकांकडून परत आलेले किंवा विक्रीस अयोग्य अन्नपदार्थ पुन्हा विक्रीसाठी उपलब्ध होणार नाहीत याची खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. अशा साठ्याचे वर्गीकरण, प्रमाणन, अधिकृत विल्हेवाट संस्थेची पडताळणी, वाहतूक आणि प्राप्तीच्या नोंदी तसेच अंतिम विल्हेवाटीचे पुरावे जतन करणे आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध उपलब्ध पुरावे आणि कायद्यातील तरतुदींनुसार कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. नागरिकांनी पॅकबंद अन्न खरेदी करताना उत्पादन दिनांक, बॅच क्रमांक, Best Before किंवा Use By तारीख, पॅकेजची स्थिती आणि लेबलवरील माहिती तपासावी. कालबाह्य, खराब किंवा संशयास्पद अन्नपदार्थ विक्रीस आढळल्यास 1800-222-365 या टोल-फ्री क्रमांकावर किंवा Food and Drug Grievance Portal वर तक्रार नोंदवता येईल.

Exit mobile version