Raj Thackeray On BMC Election : राज्यात 29 महापालिकांसाठी सुरु असणाऱ्या निवडणूक प्रक्रियेवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत राज्य निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला आहे. संपूर्ण प्रशासन आणि यंत्रणा ही सत्ताधाऱ्यांना निवडून आणण्यासाठी कामाला लागली असून हे काही चांगल्या लोकशाहीचे लक्षण नाही. सत्तेत येण्याला विजय म्हणत नाही अशी टीका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली आहे. मुंबई महापालिकेसाठी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर राज ठाकरे माध्यमांशी बोलत होते.
माध्यमांशी बोलताना राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले की, सध्या निवडणुकीबाबत कशाप्रकारची यंत्रणा सुरु आहे हे आपण सगळे बघत आहोत.येन केन प्रकारे निवडणूक जिंकायच्या हे सत्ताधाऱ्यांनी ठरवले आहे. आम्ही दुबार मतदारांचा मुद्दा समोर आणला तेव्हा निवडणूक आयोगाने आमच्या याच्याशी काहीही संबंध नसल्याचे सांगितले. दुबार मतदारांनंतर आम्ही व्हिव्हीपॅटचा मुद्दा उपस्थित केला. व्हीव्हीपॅट मशीन नसल्याने आपण दिलेले मतदान आपल्याच उमेदवाराला गेले आहे की नाही हे कळत नाही. या सगळ्यानंतर निवडणूक आयोगाने पाडू यंत्र आणले. हे पाडू यंत्र मतमोजणीवेळी वापरले जाणार आहे. सरकारने ठरवलेच आहे, विरोधी पक्ष नावाची गोष्ट शिल्लकच ठेवायची नाही असं माध्यमांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले.
पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, पाडू यंत्र कोणत्याही पक्षाला राज्य निवडणूक आयोगाने दाखवले नाही. याबाबत निवडणूक आयोग माहिती देखील देत नाही. यापूर्वी मतदान केल्यानंतर बोटावर शाई लावली जायची पण आता मार्करने मतदारांच्या बोटावर खूण केली जात आहे. मार्करने लावलेली शाई सॅनिटायझरने हात धुतल्यानंतर पुसली जात असल्याचा दावा देखील माध्यमांशी बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले.
मुंबई कल्याण महापालिका निवडणूक बोटावरची शाई पुसली, बोगस मतदानाचा धोका वाढला; विरोधक आक्रमक
मुंबई महापालिकेसाठी सकाळी 11.30 वाजेपर्यंत 17.73 टक्के मतदान झाले आहे. तर या निवडणुकीचे निकाल 16 जानेवारी रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
