धोंड्याचा महिना सुरू आहे. (Sangli) सधया गावोगावी जावयांना सासरवाडीत जेवणाचा बेत आखाला जातो. परंतु, यामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विम्याचे 30 लाख रुपये मिळविण्यासाठी मेहुण्याने स्वतःच्या भाऊजीची 3 लाख रुपयांची सुपारी देऊन खून केल्याचा धक्कादायक प्रकार कवठेमहांकाळ तालुक्यातील चोरोचीमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणातील मृत व्यक्तीची सुरुवातीला अपघात म्हणून नोंद झाली होती. मात्र, या अपघाती मृत्यू असलेल्या प्रकरणात पोलिसाना संशय आल्याने अधिक तपासात ही बाब समोर आली.
तपासादरम्यान विम्याचे 30 लाख रुपये मिळविण्यासाठी 3 लाख रुपयांची सुपारी देऊन खून झाल्याचं निष्पन्न झालं. याप्रकरणी पोलिसांनी रामचंद्र धनप्पा खिलारे (रा. अष्टविनायक नगर, विश्रामबाग, सांगली) व तुकाराम मारुती सांगोलकर (रा. खेराव, ता. जत) या दोन आरोपींना अटक केली आहे. सख्ख्या मेहुण्यानेच स्वतःच्या भाऊजीचा पैशासाठी खून केल्याचे पोलिसांनी उघडकीस आणलं आहे.
हुंड्यासाठी छळ अन् गर्भपातासाठी बळजबरी; पुण्यात २५ वर्षीय विवाहितेची आत्महत्या
19 मे 2026 रोजी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास विजापूर–गुहागर राष्ट्रीय महामार्गावरील चोरोची गावाजवळील प्रेम ढाब्याजवळ दत्तात्रय भगवान चावरे (वय 44, रा. खेराडकर पेट्रोल पंपाजवळ, अभयनगर, सांगली) हे मयत अवस्थेत आढळून आले होते. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा अपघाती मृत्यू असल्याचं मानलं जात होतं. मात्र, शवविच्छेदन अहवाल, घटनास्थळ पंचनामा आणि वैद्यकीय निष्कर्षातून मृत्यू अपघातामुळे नसून डोक्यात गंभीर मारहाण झाल्यामुळं झाल्याचा संशय आला. त्यानंतर कवठेमहांकाळ पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला.
तपासादरम्यान पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीमंत करे यांना मिळालेल्या माहितीनुसार रामचंद्र धनप्पा खिलारे (रा. अष्टविनायक नगर, विश्रामबाग, सांगली) आणि तुकाराम मारुती सांगोलकर (रा. खेराव, ता. जत) यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीत आर्थिक व्यवहाराच्या वादातून दत्तात्रय चाबरे यांच्या खुनासाठी सुपारी देण्यात आल्याची माहिती समोर आली. त्यानुसार मारहाण करून खून करण्यात आला आणि नंतर तो अपघात असल्याचं भासविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं तपासात निष्पन्न झालं. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
चोरोची गावाजवळ घडलेल्या या खळबळजनक घटनेचा उलगडा करत कवठेमहांकाळ पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावला आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रविण कुमार कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर, पोहेकॉ श्रीमंत करे, नागेश मासाळ, पोलीस हवालदार निवृत्ती कारंडे, अभिजित कटार, स्वप्नील पाटील तसेच सायबर पोलीस ठाण्यातील विजय पाटणकर व कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कारवाई केली.
