“वाळवा तालुका वाकत नाही फंदफितुरी झाली तरी”, अजितदादांसमोरच जयंत पाटलांची मार्मिक टोलेबाजी
वाळवा तालुका हा फार स्वाभिमानी लोकांचा तालुका आहे. या तालुक्याला स्वातंत्र्यसैनिकांची फार मोठी परंपरा आहे.

Jayant Patil Speech : राज्याच्या राजकारणात आज एक मोठी घडामोड घडली. उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार जयंत पाटील आणि आमदार रोहित पवार सांगलीत एका कार्यक्रमानिमित्त एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना जयंत पाटील (Jayant Patil) यांनी अजित पवार यांच्यासमोरच वाळवा तालुका सहजासहजी वाकत नाही, भूमिका बदलत नाही. हेच वाळवा तालुक्याचेही वैशिष्ट्य आहे. सहजासहजी वाकत नाही. घाबरून जात नाही. कितीही फंदफितुरी झाली तरी इथली माणसं स्वाभिमानाने राहतात असे वक्तव्य केले. या वक्तव्यातून जयंत पाटील यांनी एक प्रकारे अजित पवार यांना (Ajit Pawar) टोला लगावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या प्रा.डॉ. एनडी पाटील विधी महाविद्यालय, श्रीमती सरोज नारायण पाटील मानसशास्त्र संशोधन केंद्र आणि प्रा. डॉ. एनडी पाटील बहुउद्देशीय सभागृहाच्या उद्घाटन कार्यक्रमात पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार रोहित पवार उपस्थित होते.
मी व्यासपीठावरील दोन्ही दादांना (चंद्रकांत पाटील आणि अजितदादा) सांगू इच्छितो वाळवा तालुका हा फार स्वाभिमानी लोकांचा तालुका आहे. या तालुक्याला स्वातंत्र्यसैनिकांची फार मोठी परंपरा आहे. ज्यांनी ब्रिटिशांशी संघर्ष करताना कधीही माघार घेतली नाही. हे या तालुक्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहायचे हे आयुष्याच्या अखेरपर्यंत एनडी पाटील सरांनी दाखवून दिलं. हाच या तालु्क्याचा आदर्श आहे.
Video : मुख्यमंत्री असताना शिंदेंनी मिळवलेला पैसा भाजपने कसा वापरला?, वडेट्टीवारांचे वादळी खुलासे
तसेच हा आमच्या तालुक्याचा प्रॉब्लेम पण आहे. सहजासहजी वाकत नाही. सहजासहजी शरण जात नाही. लढाई करायची असेल तर ती करताना मग कधी कितीही फंदफितुरी झाली तरी ते जे आहेत त्यांना बरोबर घेऊन लढायचं हे एनडी पाटलांपासून सगळ्या स्वातंत्र्यसैनिकांनी आम्हाला शिकवलं आहे. हा प्रॉब्लेम पण आहे आणि आमच्या स्वाभिमानाचे केंद्र सुद्धा आहे.
मी प्रा. डॉ. एनडी पाटील यांचा प्रचंड आदर करतो. या माणसानं विचारांशी कधीच प्रतारणा केली नाही. कधी विचार बदलले नाहीत. कधी भूमिका बदलली नाही. सत्ता इकडून तिकडे गेली म्हणून त्यांनी उडी मारल्याचं कधी तुम्ही ऐकलं आहे का, तर कधीच नाही. त्यांचं माहात्म्य त्यातच आहे.
मला आठवतं 2014 साली इलेक्शन होतं. मी बाहेर प्रचाराला फिरत होतो आणि इकडे माझ्या प्रचारासाठी इस्लामपुरात सभा होती. मला माहितीच नाही. पाऊस चालू होता. एनडी पाटील साहेब आलेत म्हटल्यानंतर मी या ठिकाणी आलो. दहा मिनिटे होतो. पाऊस चालू असतानाही एनडी पाटील साहेबांनी या सभेत येऊन भाषण केलं होतं. तुझा विचार बरोबर असेल तर मी तुझ्या बाजूने आहे जर चुकीचा असेल तर मी विरोधात असेल अशी त्यांची भूमिका त्यांनी आमच्याबाबतीत कायम ठेवली असे जयंत पाटील यांनी सांगितले.