सातारा हादरवणारे हत्याकांड: गुंतागुंतीच्या अनैतिक संबंधाच्या चौकटीतून 27 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या

अनैतिक संबंधांच्या वादातून 27 वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या, पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेहाचे तुकडे करून नदीत व शेततळ्यात फेकले.

Untitled Design (305)

Untitled Design (305)

Brutal murder of a 27-year-old youth within the immoral relationship : सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक हत्येची घटना समोर आली असून, या क्रूर गुन्ह्यामुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेलाय. अनैतिक संबंधांच्या वादातून एका 27 वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली असून, हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाचे तुकडे करून ते नदी आणि शेततळ्यात फेकून देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर येतीये.

नेमकी घटना काय?

हत्या झालेल्या तरुणाचे नाव सतीश उर्फ आप्पा दादासाहेब दडस असे असून, तो फलटण तालुक्यातील सोमंथळी गावचा रहिवासी होता. पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, सतीशचे एका विवाहित महिलेशी अनैतिक संबंध होते. मात्र, ही महिला केवळ सतीशसोबतच नव्हे तर तिच्या पतीव्यतिरिक्त आणखी एका तरुणासोबतही संबंधात होती. या गुंतागुंतीच्या ‘प्रेमाच्या चौकोणातून’च हा रक्तरंजित कट रचण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झालंय.

हत्येचा कट आणि अंमलबजावणी

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेनं तिचा पती आणि पहिला प्रियकर यांच्या मदतीनं सतीशचा काटा काढण्याचा कट आखला. ठरलेल्या योजनेनुसार, आरोपींनी सतीशवर दगडाने हल्ला करत त्याची जागीच निर्घृण हत्या केली. इतक्यावरच आरोपी थांबले नाहीत. गुन्हा उघडकीस येऊ नये, यासाठी त्यांनी मृतदेहाचे लाकूड कापण्याच्या मशीनने तुकडे केले. हे तुकडे पोत्यात भरून परिसरातील नदीत तसेच एका शेततळ्यात फेकून देण्यात आले, जेणेकरून हत्येचे कोणतेही ठोस पुरावे शिल्लक राहू नये.

बेपत्ता प्रकरणातून उघडकीस आलेलं हत्याकांड

सतीश बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत तांत्रिक विश्लेषण, मोबाईल कॉल डिटेल्स आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान संशयाची सुई संबंधित महिलेकडे वळली. पोलिसी चौकशीत तिने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर संपूर्ण हत्याकांड उघडकीस आलं. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत महिला, तिचा पती आणि तिचा पहिला प्रियकर अशा तिघांना अटक केलीये.

मृतदेहाचे अवशेष हस्तगत, तपास सुरू

आरोपींच्या कबुलीजबाबानंतर पोलिसांनी घटनास्थळ असलेल्या नदीपात्र आणि शेततळ्यात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवली. या शोधमोहीमेत मृतदेहाचे फेकलेले अवशेष हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलंय. पुढील तपासासाठी हे अवशेष शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलेत. या प्रकरणी आरोपींविरोधात खून तसेच पुरावा नष्ट केल्याच्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, सर्व आरोपी सध्या पोलिस कोठडीत आहेत. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येतीये. या अमानुष हत्याकांडामुळे सातारा जिल्ह्यात भीतीचं आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं असून, नागरिकांकडून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी होतीये.

Exit mobile version