99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यावर कार्यक्रमस्थळीच हल्ला
99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात धक्कादायक प्रकार; संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यावर कार्यक्रमाच्या स्थळीच हल्ला.
Attack on Marathi Sahitya Sammelan working president Vinod Kulkarni : सातारा(Satara) येथे सुरू असलेल्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात धक्कादायक प्रकार घडला असून, संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी(Vinod Kulkarni) यांच्यावर कार्यक्रमाच्या स्थळीच हल्ला करण्यात आला आहे. संमेलनाचे औपचारिक उद्घाटन नुकतेच पार पडले असताना हा प्रकार घडल्याने साहित्यविश्वात एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, काही अज्ञात व्यक्तींनी कुलकर्णी यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्याची माहिती मिळताच पोलीस(Police) घटनास्थळी दाखल झाले असून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. हल्लेखोर नेमके कोण होते, तसेच हल्ल्यामागील कारण काय, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
हल्ला नेमका कसा झाला?
या घटनेबाबत कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी स्वतः घडलेला प्रकार सांगितला आहे. ते म्हणाले, ‘मी प्रकाशन कट्ट्यावर पुस्तकांचे प्रकाशन आटोपून बाहेर पडत होतो. त्याच वेळी माझ्या डोळ्यात केमिकलसारखे काहीतरी टाकण्यात आले. यावेळी ‘तुला संपवतो’ अशा धमक्याही देण्यात आल्या. मात्र मी प्रसंगावधान राखत त्या परिस्थितीतून स्वतःला वाचवले.’ हल्ल्यानंतरही आपल्या भूमिकेवर ठाम राहत कुलकर्णी पुढे म्हणाले, ‘माझा जीव गेला तरी चालेल, पण भाषा आणि साहित्याची सेवा मी शेवटपर्यंत करत राहीन. कुठल्याही धमक्यांना घाबरणार नाही.’
आम्ही आरोप करायला गेलो तर अजितदादांची अडचण होईल; रवींद्र चव्हाणांचं प्रत्युत्तर
आधीच वादाच्या भोवऱ्यात संमेलन
उल्लेखनीय म्हणजे, 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आधीपासूनच विविध वादांच्या भोवऱ्यात अडकलेले आहे. अध्यक्षीय निवड, आमंत्रणांवरून निर्माण झालेले मतभेद, तसेच काही साहित्यिकांनी व्यक्त केलेली नाराजी यामुळे संमेलनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. अशा पार्श्वभूमीवर थेट कार्याध्यक्षांवरच हल्ला झाल्याने संमेलनाच्या सुरक्षिततेवरही गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. पोलीस प्रशासनाने घटनास्थळाची पाहणी केली असून सीसीटीव्ही फुटेज तपासणे, प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवणे यासह तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली आहेत. कुलकर्णी यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, या घटनेचा साहित्यिक, सांस्कृतिक आणि राजकीय वर्तुळातून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. साहित्य संमेलनासारख्या विचारांच्या व्यासपीठावर हिंसाचार घडणे हे लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या दृष्टीने गंभीर असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणात पुढे काय घडते, हल्लेखोरांचा उद्देश काय होता, आणि दोषींवर कोणती कारवाई होते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
