ठाणे पोलीस आयुक्तांचेच व्हॉट्सॲप हॅक; स्टेटसवर 20 अश्लील व्हिडीओ, पोलीस दलात खळबळ

Thane Police Commissioner WhatsApp Hacked: सायबर गुन्हेगारांनी थेट ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांचेच व्हॉट्सॲप अकाउंट हॅक केले.

Thane Police Commissioner WhatsApp Hacked

Thane Police Commissioner WhatsApp Hacked: ठाणे: सायबर गुन्हेगारांनी (Cyber Fraud) थेट ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे (Ashutosh Dumbare) यांचेच व्हॉट्सॲप अकाउंट हॅक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यांच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर जवळपास 20 अश्लील व्हिडीओ अपलोड करण्यात आले. 17 नोव्हेंबर रोजी सायंकाळी हा प्रकार घडला. या घटनेमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली.

‘प्रत्येक भारतीयाच्या रक्तात राम आहे, मग त्याचा धर्म कोणताही असो’; जावेद अख्तर यांचं वक्तव्य चर्चेत

मंगळवारी सायंकाळी 4 वाजून 46 मिनिटांच्या सुमारास आयुक्तांच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर पहिला अश्लील व्हिडीओ दिसला. त्यानंतर काही मिनिटांतच एकापाठोपाठ एक 20 अश्लील व्हिडीओ अपलोड झाले. हा प्रकार लक्षात येताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आयुक्तांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि संबंधित यंत्रणेला तातडीने माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच गुन्हे अन्वेषण शाखा आणि सायबर पोलिसांचे पथक कामाला लागले. आयुक्तांचे अकाउंट हॅक झाल्याचा संशय असून, ते पूर्ववत करण्यासाठी तांत्रिक प्रयत्न सुरू करण्यात आले. अखेर सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास स्टेटसवर टाकण्यात आलेले सर्व आक्षेपार्ह व्हिडीओ हटवण्यात आले.

पोलिसांकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

या प्रकारानंतर ठाणे पोलिसांच्या जनसंपर्क विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रोशन साळवी यांनी प्रसिद्धीपत्रक काढून नागरिकांना सावध केले आहे. आयुक्तांच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर दिसणाऱ्या व्हिडीओंवर विश्वास ठेवू नका. ते डाउनलोड करू नका किंवा इतरांना पाठवू नका, असे आवाहन करण्यात आले आहे.

पंढरपुरात हत्येचा थरार! शिवा संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ भिंगेंना गोळ्या झाडून संपवलं

तसेच या नंबरवरून कोणताही संशयास्पद मेसेज किंवा लिंक आल्यास त्यावर क्लिक करू नये. या प्रकरणाबाबत अफवा पसरवू नयेत, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. आक्षेपार्ह व्हिडीओ किंवा अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

दरम्यान, पोलीस आयुक्तांसारख्या वरिष्ठ अधिकाऱ्याचेच व्हॉट्सॲप अकाउंट हॅक झाल्याने पोलीस यंत्रणेच्या सायबर सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

ब्रेकिंग: पुण्यातील टिंबर मार्केटमध्ये भीषण आग; 50 ते 60 दुकाने जळून खाक, 27 अग्निशमन गाड्या घटनास्थळी

follow us