उपमुख्यमंत्री शिंदेंच्या दरे गावातील मुक्कामात साताऱ्याची सत्ता समीकरणं बदलणार ?
पालकमंत्री शंभूराज देसाई तसेच राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली.
Deputy Chief Minister Eknath Shinde goes to Dare village for rest : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या सातारा जिल्ह्यातील दरे गावी दोन दिवसांच्या मुक्कामासाठी आले आहेत. हा दौरा अधिकृतदृष्ट्या विश्रांतीचा असला, तरी साताऱ्यातील राजकारण मात्र तापलेले दिसत आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे जिल्हा परिषद सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग येणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.
सातारा जिल्हा परिषदेमध्ये यंदा त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. एकूण 65 जागांपैकी सत्तेसाठी आवश्यक असलेला ३३ चा बहुमताचा आकडा कोणत्याही पक्षाला गाठता आलेला नाही. भाजपला 27 जागा मिळाल्या आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसने 20 जागांवर विजय मिळवला आहे. शिवसेनेला 16 जागा मिळाल्या असून स्वाभिमानी शेतकरी संघटना, काँग्रेस आणि अपक्ष प्रत्येकी एका जागेवर विजयी झाले आहेत. या संख्याबळामुळे जिल्ह्यात सत्ता कोणाच्या हाती जाणार, याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीचे 20 आणि शिवसेनेचे 16 सदस्य एकत्र आल्यास त्यांचा आकडा 36 वर पोहोचतो, जो बहुमतासाठी पुरेसा ठरतो. या पार्श्वभूमीवर साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई तसेच राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीत साताऱ्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसंदर्भात सकारात्मक संकेत मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
भाजप आमदार लोकायुक्तांच्या जाळ्यात; 5 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडले
दरम्यान, भाजपकडूनही सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वरिष्ठ स्तरावर चर्चा करत असल्याची माहिती मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे. साताऱ्यात महायुती म्हणून पुढे जाण्याची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, तसे न झाल्यास ‘चमत्कार करण्याची इच्छा नाही; पण वेळ पडल्यास चमत्कार करून दाखवावा लागेल,’ असेही त्यांनी सूचक विधान केले आहे.
एकूणच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दरेगावातील मुक्काम हा केवळ विश्रांतीपुरता मर्यादित राहतो की साताऱ्यातील सत्ता समीकरणांवर त्याचा परिणाम होतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. पुढील काही दिवसांत सातारा जिल्हा परिषद सत्तास्थापनेचा तिढा सुटणार का, हे स्पष्ट होणार आहे.
